मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाच्या सुरक्षेत मुंबई पोलिसांनी वाढ केली. त्या निवासस्थानच्या परिसरात घातपात घडवला जाण्याची शक्यता वर्तवणारा फोन कॉल आल्यानंतर ते पाऊल उचलण्यात आले.
महाराष्ट्र पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षाशी एका अज्ञात व्यक्तीने रविवारी सायंकाळी फोनवरून संपर्क साधला. मुंबई-गुजरात रेल्वेने प्रवास करत असताना चार ते पाच जणांच्या गटाची चर्चा माझ्या कानावर पडली. ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर घातपात घडवण्याशी संबंधित ती चर्चा होती.
मातोश्रीला धोका आहे, असे त्या फोन कॉलरने पोलिसांना सांगितले. त्या फोन कॉलची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी मातोश्रीची सुरक्षा वाढवली. फोन करणाऱ्या कॉलरला ट्रॅक करण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला. मात्र, कॉलनंतर तो फोन स्विच ऑफ असल्याचे स्पष्ट झाले.