नवी दिल्ली – कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या राम लल्लाच्या मूर्तीची अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहासाठी निवड करण्यात आली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सोमवारी याला दुजोरा दिला. कृष्णशीलावर बनवलेल्या मूर्तीचे वजन 150 ते 200 किलो असल्याचे त्यांनी सांगितले.
चंपत राय म्हणाले की, म्हैसूर येथील योगीराज यांनी साकारलेली राम लल्लाची मूर्ती ट्रस्टने तीन मूर्तींमधून निवडली आहे. या मूर्ती तीन मूर्तिकारांनी स्वतंत्रपणे कोरल्या आहेत. यापूर्वी अरुण योगीराज यांनी साकारलेली शंकराचार्यांची मूर्ती केदारनाथ येथे उभारली आहे. त्यांनी साकारलेली मूर्ती निवडण्यात आली आहे. मंदिरात जी मूर्ती स्थापित केली जाणार आहे ती प्रभू रामाची 5 वर्षे वयाची आहे. या मूर्तीची राम मंदिरात १८ जानेवारीला प्रतिष्ठाना करण्यात येईल.
तसेच सोहळ्याचा मुहूर्त वाराणसीस्थित गणेशवर शास्त्री द्रविड यांनी ठरवला आहे. या पवित्र सोहळ्याचा संपूर्ण विधी वाराणसीचे लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वात केला जाईल. याप्रसंगी अनेक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, 20 आणि 21 जानेवारीला मंदिर बंद राहील आणि 23 जानेवारीपासून नागरिकांसाठी ते खुले होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
जुन्या मूर्तीचे काय होणार?
चंपत राय यांनी सांगितले की, जुनी मूर्ती मंदिराच्या आवारातच राहणार आहे. वास्तविक, इतके दिवस ज्या मूर्तीची पूजा केली जात होती त्याचे काय होणार असा प्रश्न विचारला जात होता. चंपत राय यांनी सांगितले की, प्राणप्रतिष्ठेची पूजा विधी बुधवारपासून (16 जानेवारी) सुरू होणार असून तो 21 पर्यंत चालणार आहे. 22 जानेवारीला गाभाऱ्यात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.12 वाजल्यापासून सुरू होणारी प्राणप्रतिष्ठा 1 वाजेपर्यंत पूर्ण होईल. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सर्व मान्यवर आपल्या भावना व्यक्त करतील.