लंडन :- इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या द हंड्रेड महिला लीग क्रिकेट स्पर्धेत भारताच्या स्मृती मानधनाने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. तीने अर्धशतकांचा धडाका कायम ठेवला असून सदर्न ब्रेवकडून खेळताना मानधनाने वेल्श फायरविरूद्ध पुन्हा एक अर्धशतकी खेळी करताना 70 धावा केल्या. या खेळीत तीने 42 चेंडूत 11 चौकार फटकावले.
मानधना द हंड्रेड महिला लीग स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकी खेळी करणारी फलंदाज ठरली आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील ही तिची पाचवी अर्धशतकी खेळी आहे. यापूर्वी स्मृती आणि जेमिमा रॉड्रिग्ज या सर्वाधिक अर्धशतकी खेळी करण्याच्या कामगिरीत बरोबरी केली होती. या दोघींनी प्रत्येकी 4 अर्धशतकी खेळी केल्या होत्या. आता मानधनाने जेमिमाला मागे टाकले आहे.
इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघातील फलंदाज डेनियम वॅटने देखील द हंड्रेड स्पर्धेत 4 अर्धशतकी खेळी केल्या आहेत. या स्पर्धेत 500 धावा करणारी मानधना ही पहिली फलंदाज ठरली आहे.
2022 सालच्या मोसमात तिने सदर्न ब्रेवकडून सर्वाधिक 211 धावा केल्या होत्या. 2021 साली तिने 163 धावा केल्या होत्या. यंदाच्या मोसमात दोन सामन्यात तिने आतापर्यंत 125 धावा केल्या आहेत.