Women’s Maharashtra Premier League 2024 :- गेल्या वर्षी – २०२३ महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) ने आता महिलांसाठी महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्लूएमपीएल) स्पर्धेच्या आयोजनाची घोषणा केली आहे. एका राज्यासाठी स्वतंत्रपणे महिला प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करणारी एमसीए ही देशातील पहिली संघटना ठरली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)च्या मान्यतेखाली या स्पर्धेचे येत्या २४ जून २०२४ पासून गहुंजे येथील एमसीए स्टेडियम येथे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार, एमसीएचे सचिव ऍड. कमलेश पिसाळ, सहसचिव संतोष बोबडे, खजिनदार संजय बजाज, एमपीएलचे चेअरमन सचिन मुळ्ये, एमसीएचे अपेक्स कौन्सिल सदस्या कल्पना तापिकर आदी मान्यवर उपस्थित होते.
डब्लूएमपीएल या स्पर्धेमुळे महिला क्रिकेट मधील एक मैलाचा दगड गाठला जाणार असल्याची प्रतिक्रिया एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी व्यक्त केली. महिला क्रिकेटच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून महाराष्ट्रातील गुणवान महिला क्रिकेटपटूना या स्पर्धेमुळे आदर्श व्यासपीठ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाच्या डब्लूएमपीएल स्पर्धेत एमसीएच्या कार्यकक्षेतील चार शहरांचे प्रतिनिधीत्व करणारे चार संघ सहभागी होणार आहेत. राउंड रॉबिन पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक संघ सहा साखळी सामने खेळणार असून सर्वोत्तम दोन संघ अंतिम लढतीसाठी पात्र ठरणार आहे. गेल्या वर्षी एमसीए तर्फे सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेला प्रचंड यश मिळाले. या स्पर्धेत ऋतुराज गायकवाड, केदार जाधव, राहुल त्रिपाठी व आर्शीन कुलकर्णी असे नामवंत खेळाडू सहभागी झाले होते. हि स्पर्धा डीडी स्पोर्ट्स या वाहिन्यांवरून प्रक्षेपित करण्यात आली होती.
Team India : मोहम्मद शमी कधी करणार पुनरागमन? आयपीएल दरम्यान त्याच्या फिटनेसबाबत समोर आली मोठी अपडेट…
मानधना, नवगिरे मुख्य आकर्षण समावेश
यंदाच्या महिला प्रीमियर लीग स्पर्धेत स्मृती मंधाना (Smriti Mandhana), देविका वैद्य, अनुजा पाटील, किरण नवगिरे आणि श्रद्धा पोखरकर अशा महाराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असणार आहे. तसेच या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमा आणि स्पोर्टस 18 या वाहिन्यांवरून करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण 20 लाख रुपये विजेत्या संघाला रोख पारितोषिक देण्यात येणार असून उपविजेत्या संघाला 10 लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. महिला प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या लिलावासाठी एमसीएच्या वतीने खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे. त्या खेळाडूंमधून चारही संघांचे संघ मालक आपापल्या संघासाठी खेळाडूंची खरेदी करतील.