India Women vs England Women Test Match Shubha Satheesh : नवी मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ यांच्यात कसोटी सामना सुरू आहे. ही एकमेव कसोटी आजपासून म्हणजेच 14 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. या सामन्यात भारताकडून तीन खेळाडूंनी पदार्पण केले असून त्यात कर्नाटकातील शुभा सतीश या 24 वर्षीय तरुणीचा समावेश आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने या अष्टपैलू खेळाडूला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली आणि शुभाने त्या संधीचे सोनं केले.
पदार्पणातच झळकावलं दुसरे जलद अर्धशतक…
पदार्पणाच्या सामन्यातच शुभाने शानदार अर्धशतक झळकावून संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढलेच पण स्मृती मानधनासारख्या अनुभवी खेळाडूचा विक्रमही मोडला आणि पहिल्याच सामन्यात दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावले. शुभाने या कसोटी सामन्यात अवघ्या 49 चेंडूत अर्धशतक झळकावले, जे भारतीय महिला फलंदाजामध्ये कसोटीमधील दुसरे सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे.
भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात 51 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. शुभा आपल्या पहिल्या कसोटी सामन्यातच स्मृतींच्या विक्रमाच्या पुढे गेली आहे. मात्र, या यादीत आघाडीवर आहे ती माजी भारतीय महिला क्रिकेटपटू संगीता डबीर. जिने इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात अवघ्या 40 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
Sports Award : अर्जुन पुरस्कारासाठी ‘या’ भारतीय वेगवान गोलंदाजाच्या नावाची शिफारस..
शुभाने आज तिच्या डावात 76 चेंडूत 69 धावा केल्या. शुभा हीला सोफी एक्लेस्टोनने बाद केले. सर्वात जलद अर्धशतक झळकवण्याच्या यादीत शुभा सतीश आता संगीता डबीरनंतरची दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू तर ठरलीच आहे त्याबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी चौथी महिला क्रिकेटपटू देखील ठरली आहे. कसोटी पदार्पणात पन्नास पेक्षा जास्त धावसंख्या नोंदवणारी ती केवळ 12वी भारतीय महिला आहे. शुभाला नुकतेच 9 डिसेंबर रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने WPL 2024 च्या लिलावात 10 लाख रुपयांना विकत घेतले आहे.
सर्वात जलद अर्धशतक झळकवाणारे फलंदाज
40 चेंडू: संगीता डबीर – भारत विरुद्ध इंग्लंड, 1995
40 चेंडू: व्हेनेसा बोवेन – श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान, 1998
48 बॉल: नॅट सायव्हर-ब्रंट – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2022
49 चेंडू: शुभा सतीश – भारत विरुद्ध इंग्लंड, 2023
51 चेंडू: स्मृती मानधना – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2021
57 चेंडू: माईया लुईस – न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड, 1996
जेमिमानेही पदार्पणाच्या सामन्यात झळकावले अर्धशतक…
शुभाने आज तिच्या डावात 76 चेंडूत 69 धावा केल्या आणि यादरम्यान तिचा स्ट्राईक रेट 90.79 होता. शुभाने या खेळीत 13 चौकार मारले. तिच्याशिवाय पदार्पण करणारी दुसरी फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज आहे. कर्णधाराने तिला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठीही पाठवले होते. या महिला खेळाडूने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात 99 चेंडूत 68 धावांची खेळी खेळली.