सेल – हौथी बंडखोरांकडून सातत्याने व्यापारी जहाजांवर केल्या जाणाऱ्या ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेने पावले उचलली आहेत. व्यापारी जहाजावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागणाऱ्या हौथींच्या जहाजांवर अमेरिकेच्या नौदलाच्या हेलिकॉप्टरने जोरदार मारा केला आहे. अमेरिकेच्या या माऱ्यामध्ये काही हौथी बंडखोर मारले गेले आहेत, असे अमेरिकेच्या सैन्याने म्हटले आहे.
शनिवारी रात्री सिंगापूरच्या जहाजावर डागण्यात आलेली दोन क्षेपणास्त्रे यूएसएस ग्रेव्हली या विनाशिकेने पहिल्यांदा पाडून टाकली. सिंगापूरच्या जहाजाने संध्याकाळी धोक्याचा इशारा दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर रविवारी सकाळी चार छोट्या बोटींनी या मालवाहू जहाजाला घेरण्याचा प्रयत्न केला. या बोटींवरच्या सागरी चाच्यांनी या जहाजावर चढण्याचाही प्रयत्न केला.
त्यानंतर यूएसएस ड्वाईट डी. आयसेनहॉवर या विमानवाहू नौकेवरच्या हेलिकॉप्टरनी आगोदर इशारा दिला आणि नंतर हल्लेखोरांनी उलट गोळीबार केल्यावर या छोट्या बोटींवर जोरदार मारा केला. अमेरिकेच्या हेलिकॉप्टरांनी प्रत्युत्तरात्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये चार पैकी तीन बोटी बुडाल्या.
या बोटींवरील हल्लेखोरही मारले गेले. चौथी बोट पळून गेली, असे यूएस सेंट्रल कमांडने म्हटले आहे. या सर्व धुमश्चक्रीमध्ये अमेरिकेचे हेलिकॉप्टर किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झाली नाही. मालवाहू जहाजावरील कर्मचारी देखील सुरक्षित आहेत.
एकूण १० हौथी बंडखोर मारले गेल्याचे हौथींनी म्हटले आहे. या धुमश्चक्रीचे वाईट परिणाम होतील, अशी धमकीही हौथींनी दिली आहे.
व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने हौथींच्या बोटींवर नियोजनपूर्वक हल्ला केला होता का, असे विचारले असता व्हाईट हाऊसच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या प्रवक्त्याने उत्तर देणे टाळले आहे.
जहाजांच्या सुरक्षेसाठी आम्हाला जे करणे आवश्यक होते, ते आम्ही केले आहे. व्यापारी समुद्रातील वाहतूक अमेरिकेसाठी महत्वाची आहे. आत्मसंरक्षणासाठी जे योग्य वाटेल ते आम्ही नक्की करू, असे जॉन किरबे यांनी म्हटले आहे.