#BBL13 : मार्कस स्टॉइनिसने बिग बॅश लीगमधील पाच सामन्यांत केवळ 30 धावा केल्या होत्या. त्याला फक्त एकदाच दुहेरी आकडा पार करता आला. पण गेल्या वर्षीच्या शेवटच्या संध्याकाळी (रविवार,31 डिसेंबर 2023) त्याने मेलबर्नमध्ये बॅटने धमाका केला. त्याने अवघ्या 19 चेंडूत नाबाद 55 धावा केल्या. आणि त्याच्या खेळीमुळे बिग बॅश लीगचे सर्वात मोठे लक्ष्य गाठले गेले. मेलबर्न स्टार्सने अॅडलेड स्ट्रायकर्ससमोर 206 धावांचे लक्ष्य गाठले. ही स्फोटक फलंदाजी पाहण्यासाठी मोसमातील सर्वाधिक प्रेक्षक देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते.
An unreal chase by @starsbbl! 😱 #BBL13 pic.twitter.com/icxTQPTZy5
— KFC Big Bash League (@BBL) December 31, 2023
स्टॉइनिसने यापूर्वी पाच सामन्यांत 2,13,9,6 आणि 0 धावा केल्या होत्या. साहजिकच त्याच्यावर दबाव होता. पण या उजव्या हाताच्या अष्टपैलू खेळाडूने दडपण कमी करण्याचा मार्ग म्हणून आक्रमणाचा वापर केला. त्याने बिग बॅश लीगमधील दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकावले. 14व्या षटकात स्टॉइनिस फलंदाजीसाठी आला. त्याने आपल्या खेळीत चार षटकार आणि सहा चौकार लगावले. स्टॉइनिसने 19व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. स्टार्सने हा सामना 7 गडी राखून जिंकला.
Stoinis crunches it for six!!! #BBL13 pic.twitter.com/ztd5xx25G2
— KFC Big Bash League (@BBL) December 31, 2023
206 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मेलबर्न स्टार्स संघाला डॅनियल लॉरेन्स (26 चेंडूत 50), ब्यू वेबस्टर (48 चेंडूत नाबाद 66) यांनी वेगवान सुरुवात करून दिली. ग्लेन मॅक्सवेलनेही 17 चेंडूत 28 धावा केल्या. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर स्टॉइनिस क्रीजवर आला.
सामन्यानंतर स्टॉइनिस म्हणाला, ‘मॅक्सी आणि ब्यू वेबस्टर यांच्यातील भागीदारीनंतर माझे विचार अजिबात बदलले नाहीत. त्यांनी आम्हाला अशा स्थितीत आणून ठेवले होते की, जिथे मी मुक्तपणे खेळू शकेन. नाहीतर मला थोडा वेळ द्यावा लागला असता. एकदा चेंडू तुमच्या बॅटच्या मध्यभागी आदळला की तुमचे शरीर व्यवस्थित होऊ लागते. इथले हवामान खूप छान आहे, प्रेक्षकही अप्रतिम होते. सुमारे 44 हजार प्रेक्षक, नवीन वर्ष साजरे करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. यापेक्षा मोठा आनंद असूच शकत नाही.
तत्पूर्वी, ख्रिस लिनच्या खेळीमुळे स्ट्रायकर्स संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 205 धावा केल्या. लिनने 42 चेंडूत नाबाद 83 धावा करताना 10 चौकार आणि 4 षटकार मारले. मॅथ्यू शॉर्ट्सने त्याला चांगली साथ दिली. शॉर्ट्सने 32 चेंडूत 56 धावा केल्या.