सोळा संवेदनशील मतदान केंद्र!

मावळ विधानसभा मतदारसंघ : सुमारे तीन लाख, 22 हजार, 112 मतदार

मावळ – मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ विधानसभा मतदार संघात सुमारे तीन लाख 22 हजार 112 मतदार मतदान करणार आहेत. त्यापैकी सुमारे एक लाख 71 हजार 989 पुरुष आणि एक 60 हजार 123 स्त्री मतदार आहेत. खडकाळा आणि तळेगाव परिसरात 16 संवेदनशिल केंद्र असून, तालुक्‍यात सुमारे 354 मतदान केंद्र आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी सुभाष भागडे यांनी दिली.

कामशेत शहरामध्ये सुमारे आठ हजार 762 मतदार असून, त्यापैकी चार हजार 508 पुरुष, चार हजार 254 स्त्री मतदार आहेत. कामशेत शहरामध्ये लोकसभा निवडणुकीत नव्याने नोंद झालेले अनेक उत्साही तरुण मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. कामशेत शहरामध्ये ग्रामपंचायतीचे सहा वॉर्ड असून, मतदानाचे भाग यादी प्रमाणे नऊ मतदान केंद्रावर मतदार मतदान करणार आहेत. या केंद्रांपैकी केंद्र क्रमांक 93, 94, 95 मधील मतदान जिल्हा शिक्षण मंडळाच्या पंडित नेहरू विद्यालयात होणार आहे. केंद्र क्रमांक 96 ते 101 मधील मतदान जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत होईल.

कामशेत शहरातील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या पंडित नेहरू विद्यालयात तीन केंद्रांचे मतदान हे शाळेच्या नवीन इमारतीत होते. नवीन इमारत ही मोठ्या उंचावर असून, याठिकाणी मतदानास जाताना सुमारे 50 हून अधिक पायऱ्या चढून जावे लागते. याठिकाणी शाळेची जुनी इमारत खाली असून, जुन्या इमारतीस जाण्यासाठी अवघ्या 10 पायऱ्या चढून जावे लागत असताना नवीन इमारतीमध्ये मतदान केंद्र ठेवण्याचा अट्टाहास का, असा प्रश्‍न मतदार विचारात आहेत. येथे ज्येष्ठ नागरिक मतदारांचे हाल होत असून, त्यामुळे मतदानाचा टक्‍का कमी होत आहे.

मागील निवडणुकीत उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनादेखील मतदानास आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वर-खाली सोडताना मोठी कसरत करावी लागली होती. तर अनेक वयोवृद्धांनी मतदान न करताच घरी जाणे पसंत केले होते. याच प्रमाणे शहरातील बंगला कॉलनी, माऊलीनगर परिसर वार्ड निहाय रचनेमुळे 4 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांना चुकीच्या वॉर्डरचनेमुळे आणि त्याच्या जवळील 5 नंबरच्या वार्डमधील मतदारांसाठी नाणे रोडवर असलेली अंगणवाडी येथे केंद्र केल्यास मतदारांचा विशेष करून ज्येष्ठ मतदारांचा त्रास कमी झाला असता, त्यांना सुमारे 1 ते 2 किलोमीटर अंतरावर मतदान करायला जावे लागत आहे.

निवडणुकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानासाठी इंद्रायणी कॉलनी, पंचशील कॉलनी, गरुड कॉलनी याठिकाणच्या नागरिकांना पुणे-मुंबई महामार्ग ओलांडून यावे लागत आहे. अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत. नागरिकांना उन्हामध्ये उभा राहून मतदान करावे लागणार आहे. तसेच घरापासून दूर असणाऱ्या मतदार केंद्रापर्यंत मतदानासाठी जावे लागणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहरातील मतदान केंद्रे ही दोन शाळांमध्ये उभी केली असल्यामुळे बंदोबस्त चोख ठेवता येणार आहे. भर उन्हाळ्यात लांबच्या अंतरावरील असलेल्या मतदारांना मतदानासाठी घेऊन येण्यासाठी कार्यकर्त्यांना मात्र मोठी कसरत करावी लागणार आहे. एकाच ठिकाणी मतदान केंद्रे आल्यामुळे सकाळी व संध्याकाळी याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होणार आहे.

पोलीस प्रशासनापुढे मोठे आव्हान

काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी भर दिवसा मतदान केंद्र हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी मुख्य बाजार पेठेत गोळी घालून मनसे पदाधिकाऱ्यांचा खून करण्यात आला होता. त्यानंतर सातत्याने कामशेत शहारामध्ये दोन गटांमध्ये तणावपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे सकाळी व संध्याकाळी होणारी गर्दी व गटा-गटातील तणाव यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवणे हे पोलीस प्रशासनापुढे आव्हान आहे. याच प्रमाणे कांब्रे, नाणे व अन्य काही ग्रामीण भागामध्येदेखील गावांमध्ये गट-तट असून, त्याठिकाणी तणावपूर्ण वातावरण कायम निर्माण होत आहे.

मावळ विधानसभा क्षेत्रात 40 झोन तयार केले आहेत. त्याअंतर्गत 354 रेग्युलर आणि 15 तात्पुरती अशी 369 मतदान केंद्र तयार केली आहेत. तालुक्‍यातील निवडणुकांचा पूर्वइतिहास पाहता खडकाळा आणि तळेगाव परिसरातील 16 संवेदनशिल मतदान केंद्र आहेत. सोमाटणे टोलनाका, इंदोरी टोलनाका, वरसोली टोल नाका आणि चाकण चौक (तळेगाव) या चार ठिकाणी दिवस-रात्र अशी आठ पथके तपासणीसाठी तयार केली आहेत. याशिवाय आठ फिरती पथके तैनात आहेत. याशिवाय उमेदवार खर्च, सभांचे शुटिंग, आचारसंहिता कक्ष, तक्रार निवारण कक्ष तयार केले आहेत.

– सुभाष भागडे, प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.