सहा गावांचा “सेतू’ संकटांच्या फेऱ्यात

बंधाऱ्याच्या त्वरित दुरुस्तीसाठी रहिवासी आग्रही
पाणी गळतीच्या नावाखाली केली जातेय डागडुजी
वडगाव मावळ – माऊलीनगर (कामशेत) जवळील नाणे-नाणोली कोल्हापुरी पाटबंधाऱ्याची दुरवस्था झाली. दरवर्षी पाणी गळतीच्या नावाखाली तात्पुरत्या डागडुजीसाठी शासनाचा निधी वापरला जातो. याच बंधाऱ्यावरून नवीन उकसान ग्रामस्थांची ये-जा सुरू असते. पावसाळ्यात हा बंधारा अनेक वेळा पाण्याखाली जात असल्याने त्यांचा संपर्क तुटतो. या बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती करून परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली.

वडगाव मावळ माऊलीनगर (कामशेत) जवळील नाणे-नाणोली कोल्हापुरी पाटबंधाऱ्याची दुरवस्था झाली. दरवर्षी पाणी गळतीच्या नावाखाली तात्पुरत्या डागडुजीसाठी शासनाचा निधी वापरला जातो. याच बंधाऱ्यावरून नवीन उकसान ग्रामस्थांची ये-जा सुरू असते. पावसाळ्यात हा बंधारा अनेक वेळा पाण्याखाली जात असल्याने त्यांचा संपर्क तुटतो. या बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती करून परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांनी केली.

नाणे-नाणोली कोल्हापुरी बंधाऱ्याची उभारणी सन 1991-92 साली परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध करण्यासाठी करण्यात आली. या बंधाऱ्याचे पाणी अडवण्याचे दगडी गाळे मोठ्या प्रमाणात तुटलेले असून, लोखंडी गेट पूर्णतः गंजलेले आहे. काही गेट चोरीला गेल्याची दिसत आहे. या बंधाऱ्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या, पोती, थर्माकोल, जीर्ण झालेले कपडे व जंगली गवत वाढलेले असल्याने परिसरात दुर्गंधी परसली आहे.

या बंधाऱ्यावरून अनेक शेतकऱ्यांना कृषिपंपांचे वीज मीटर देण्यात आले असून, माऊलीनगर परिसरातील नागरिकांना याच बंधाऱ्यातून दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. या बंधाऱ्याची देखभाल करण्यासाठी पाट बंधारे विभागाने चौकीदारासाठी इमारत बांधली असून, त्या इमारतीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चौकीदार व अधिकारी फिरकले नसल्याने त्या इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. इमारतीत जंगली झाडांचा व गवताचा विळखा आहे. परिसरात घुशीने उकिर काढले असून, मोकाट कुत्री, उंदिर, साप, विंचू व मुंग्यांचा वावर आहे.

या बंधाऱ्याची दुरवस्था झाल्याने बंधाऱ्यात पूर्णक्षमतेने पाणीसाठा होत नसल्याने गेल्या वर्षी बंधाऱ्याची दुरुस्ती न करता, शासनाच्या निधीतून सिमेंटच्या पोतीत माती भरून बंधाऱ्याच्या बाजूला मातीचा बंधारा घातला. हे काम ठेकेदारामार्फत न करता, शासनाच्या कर्मचाऱ्यांकडून करून घेतले जाते. या बंधाऱ्याच्या गाळ्याची आणि गेटची नावालाच डागडुजीकरून बिल काढले जातात. याच बंधाऱ्यावरून नाणे, नवीन उकसान, साई, वाउंड, घोणशेत परिसरातील विद्यार्थी, कामगार, दुग्धव्यावसायिक, शेतकरी, ग्रामस्थ मावळ तालुक्‍याची बाजारपेठ असलेल्या कामशेत शहरात ये-जा करतात.

पावसाळ्यात अनेक वेळा या बंधाऱ्यावरून पाणी वाहत असल्याने या गावांचा संपर्क तुटतो. या बंधाऱ्यात दूषित सांडपाणी सोडले जात आहे. पाटबंधारे विभाग डोळेझाक करत आहे. बंधाऱ्याची दुरवस्था झाल्याने उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी कमी पडल्याने उत्पादनात घट होते. या बंधाऱ्याची त्वरित दुरुस्ती करून परिसर स्वच्छ करावा तसेच चौकीदाराच्या इमारतीची दुरुस्ती करण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, अतुल वायकर, माजी उपसरपंच संतोष कोंढरे, दत्तोबा आंद्रे, रमेश भुरूक, मोहित कदम, किरण मोहिते आदींनी केली. वडिवळे पाटबंधारे विभाग शाखा अभियंता मनोहर खाडे म्हणाले की, नाणे-नाणोली या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा सुरू असून, मंजुरी मिळाल्यास त्वरित काम केले जाईल. बंधारा दुरुस्ती केल्यामुळे पाणीसाठ्यातही वाढ होईल. त्याचा पुढील वर्षी उन्हाळ्यात फायदा होईल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here