पुणे – दाखल्यांसाठीचे मुद्रांक शुल्क माफ

साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र द्यावे लागणार


प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा


महा-ई सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून दिशाभूल


राज्य शासनाने आदेश देऊनही पिळवणूक सुरूच

पुणे – उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र आदींसाठी प्रतिज्ञापत्रासाठी मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नाही. सरकारने अशा प्रमाणपत्रासाठीचे मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे. त्यामुळे साध्या कागदावर स्वयंघोषणापत्र किंवा नागरी सुविधा केंद्रात प्रतिज्ञापत्र केले तरी चालते. त्यासाठी 100 रुपयांच्या स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्‍यकता नाही. या निर्णयामुळे दहावी-बारावीच्या निकालानंतर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

सध्या विविध प्रवेशाची लगबग सुरू आहे. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यासाठी आवश्‍यक ती कागदपत्रे मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ होत आहे. जात, उत्पन्न, रहिवासी आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नागरी सुविधा केंद्र आणि महा-ई सेवा केंद्रात गर्दी होत आहे. या सर्व प्रमाणपत्रासाठी “100 रुपयांच्या स्टॅंम्पवर प्रतिज्ञापत्र करून घेऊन या,’ अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते. यासाठी 100 रुपयांच्या स्टॅम्प, नोटरी आदींसह 300 ते 500 रुपयांपर्यंत खर्च येतो. तसेच नागरी सुविधा केंद्र आणि महा ई सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांकडून 100 रुपयांच्या स्टॅंम्पवरच ही माहिती देण्याचा आग्रह धरला जात होता. महा-ई सेवा केंद्रातील कर्मचारी नागरिकांची दिशाभूल करतात.

राज्य शासनाने विविध प्रकारची प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी तसेच सरकारी कार्यालये आदी सर्व प्रतिज्ञापत्रांचे मुद्रांक शुल्क माफ केले आहे. त्यासाठीचे राजपत्र शासनाने यापूर्वीच प्रसिद्ध केले आहे. मात्र या निर्णयाची नागरिकांना माहिती नसल्याने महा-ई सेवा केंद्र चालक 100 रुपयांचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्राची मागणी करतात. त्यामुळे पालकांना आर्थिक भुर्दंड बसत होता. तसेच वेळही जात होता. निकालानंतर संपूर्ण जिल्ह्यात सुमारे 4 लाख विद्यार्थी विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तहसिलदार अथवा प्रांताधिकारी यांच्याकडे अर्ज करतात. या निर्णयामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

अधिकारी म्हणतात…
खरेदी-विक्री, गहाणखत अशा विविध व्यवहारांसाठी मुद्रांक शुल्क आवश्‍यक आहे. मुद्रांक कशासाठी आवश्‍यक आहे, त्याची यादी विभागाने प्रसिद्ध केली आहे. अन्य कारणांसाठी मुद्रांक पेपरवर प्रतिज्ञापत्र करण्याची गरज नसल्याचे नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×