अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करा

ना. विजय शिवतारे यांचे आदेश : पाण्याच्या बाबतीत राजकीय तडजोड नाही

ग्रामपंचायत कार्यालयात मिळणार माहिती

टंचाईग्रस्त गावांमधील पशुधनाची माहिती घेऊन ती तहसीलदारांकडे सादर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना दिले. प्राप्त माहितीच्या आधारे टंचाईग्रस्त गावातील माणसे आणि जनावरांसाठी पाण्याच्या टॅंकरच्या खेपा सुरू करा. जनावरांसाठी आणि माणसांसाठी किती पाणी वितरीत करण्यात येत आहे, याची माहिती ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीसबोर्डवर लावा, असे आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

जलयुक्त शिवारवरून कलगीतुरा

जलयुक्त शिवारचा मोठा गाजावाजा केला, यंदा काही कामे हाती घेतली आहेत का, अशी विचारणा आ. मकरंद पाटील यांनी ना. विजय शिवतारे यांच्याकडे केली. त्यावर शिवतारे म्हणाले, जलयुक्त शिवारचा गाजावाजा नव्हे, मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली आहेत. मात्र, पाऊसच पडला नसल्यामुळे परिणाम दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यावर आ. मकरंद पाटील म्हणाले, आमच्या महाबळेश्‍वरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. परंतु पाणी अडविण्यात येत नसल्यामुळे त्या ठिकाणी देखील दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर पालकमंत्र्यांनी कामाचे प्रस्ताव सादर करा तत्काळ मंजुरी देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

सातारा – टंचाईच्या उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील धरणातून टॅंकर फिडींग पॉइंटमध्ये सोडण्यात आलेले पाणी फक्त पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मात्र, शेतीसाठी बळाचा वापर करून अवैधरित्या उपसा करण्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे आता अशा घटना रोखण्यासाठी महसूल व गृह विभागाने अवैध उपसा करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, असे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिवतारे यांनी हे आदेश दिले. यावेळी आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे आदी उपस्थित होते.

बैठकी दरम्यान, आ. शशिकांत शिंदे यांनी टॅंकर फिडींग पॉइंटच्या तलावातून शेतीसाठी पाणी उपसा होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली, अशी विचारणा केली. विद्युत मोटारी जप्त केल्या असून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचबरोबर जप्तीची कारवाई करताना पाटोळे नामक व्यक्तीने बळाचा वापर केला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पालकमंत्री चांगलेच संतप्त झाले. ते म्हणाले, अवैध पाणी उपसा करणारा कोणत्याही पक्षाचा असो पाण्याच्या बाबतीत कोणतीही राजकीय तडजोड केली जाणार नाही.

अशा प्रकारे उपसा करणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करा. दहा ते पंधरा दिवस जेलमध्ये बसविले की बाकीचे जण शहाणे होतील, अशा शब्दात शिवतारे यांनी आदेश दिले. आ. मकरंद पाटील यांनी खंडाळा तालुक्‍यातील अहिरे या गावाला चारा छावणी देण्याची मागणी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी संस्थेमार्फत प्रस्ताव सादर करा, एका दिवसात मंजुरी दिली जाईल, असे सांगितले.

कोरेगाव पंचायत समितीचे सभापती जगदाळे यांनी देऊर येथे दहा दिवस टॅंकरने पाणीपुरवठा केला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर पालकमंत्र्यांनी टॅंकर ठेकदाराला दंड करूनच त्याचे बिल अदा करा, असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले. पुढे पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना देत, टंचाईग्रस्त गावांना टॅंकरचे पाणी देताना सन 2019 लोकसंख्येचा विचार करुन पाणी द्या, प्रत्येक माणसी 20 लिटर व प्रत्येक जनावराला 35 लिटर या प्रमाणे पाणी द्या, अधिग्रहीत करण्यात आलेल्या विहिरींना वीज कनेक्‍शन तत्काळ द्या, दुष्काळ निवारणात हलगर्जी होता कामा नये, असे आदेश दिले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.