ठाणे – ठाण्यात सख्ख्या तीन भावांनी बहिणीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ठाण्यातील डायघर पोलीस स्टेशन परिसरात घडला आहे. बहिणीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन वारंवार होत असलेल्या भांडणाचा शेवट निर्घृण हत्येने झाल्याने डायघर गावात एकच खळबळ उडाली आहे.
प्रतिभा प्रविण म्हात्रे (वय 29) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, डायघर येथे राहणाऱ्या प्रतिभा हिचा विवाह 2009 साली झाला होता. मात्र, एका वर्षातच तिचा घटस्फोट झाला. तेव्हापासून प्रतिभा आपल्या आईवडील व भावासोबत डायघर येथे माहेरी राहत होती. प्रतिभा अधून-मधून अचानक घर सोडून निघून जायची. ती कुठे जाते याची चौकशी भावांनी केली असता ती बिअर बारमध्ये महिला वेटर म्हणून देखील काम करीत असल्याची माहिती भावांना मिळाली होती.
एप्रिल महिन्यात ती 15 दिवस घरी काही न सांगता बाहेरगावी गेली होती. ती परत आल्यावर भावांनी तिला विचारले असता तिने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. या कारणावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते.
भांडण टोकाला जाऊन तीन सख्ख्या भावांनी लोखंडी सळईने प्रतिभाला बेदम मारहाण केली. त्यातच तिने जीव सोडला. ही घटना कोणाला कळू नये या म्हणून तिघांनी बहिणीच्या शरीराचे तुकडे करुन तिला 1मे च्या रात्रीच जाळून टाकले.
मात्र, याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रतिभाच्या भावांची कसून चौकशी केली असता तिची हत्या करुन तिला जाळून टाकल्याचे तिघांनी कबूल केले.