मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना आपल्याबरोबर घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. स्वतः उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि इतर नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली. या राजकीय नाट्यामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली. आता त्यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून प्रतिक्रिया येत आहेत. महाविकासआघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस नेत्यांकडूनही यावर भाष्य करण्यात आले आहे. अशात पक्षातील आमदार खासदार आता नेमके कुणाच्या बाजूने आहे अशी चर्चा सुरु आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आमदार आहेत. हे सर्व आमदार अजित पवार यांच्या सोबत असल्याची माहिती सध्या वृत्तवाहिमांनी प्रसारित केली आहे. यामध्ये छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ, दिलीप बनकर, नितीन पवार, सरोज अहिरे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ हे आमदार आहेत. एकंदरीत सध्या तरी नाशिक जिल्ह्यात अजित पवार यांचे पारडे जड आहे.
दरम्यान, येत्या बुधवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी दोन्ही गटांकडून जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्ते यांना फोनाफोनी सुरू झाली आहे. बैठकीच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असल्याने पदाधिकाऱ्यांना निमंत्रणे धाडण्यात आली आहेत. त्यामुळे कोणत्या बैठकीस उपस्थित राहायचे तसेच कोणत्या गटाकडे जायचे, असा संभ्रम पदाधिकाऱ्यांचा झाला असून, “साहेब की दादा?’ या दोघांपैकी कोणाची निवड करायची, असा यक्ष प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.