मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान “सिल्वर ओक’वर झालेल्या आक्रमक आंदोलन प्रकरणातील आरोपी संदीप गोडबोलेला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी गोडबोलेला आज किल्ला न्यायालयात हजर केले. या सुनावणीवेळी संदीप गोडबोलेने थेट ऍड. गुणरत्न सदावर्ते यांचा उल्लेख करत धक्कादायक कबुलीनामा दिला.
मुंबई पोलिसांनी संदीप गोडबोलेला नागपूरमधून अटक केली होती. गोडबोले हा आरोपी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या संपर्कात असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. आज कोर्टात हजर केल्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. यावेळी आरोपीकडून त्याचा मोबाइल फोन ताब्यात घ्यायचा असल्याचे सरकारी वकीलांनी म्हटले. आरोपी ऍड. सदावर्ते यांच्या फोनमध्ये व्हॉट्स ऍप कॉल आणि मेसेज होते. हे फोन नागपूरला करण्यात आले. याचा तपास करताना आरोपीचे नाव समोर आले होते, असे सरकारी वकिलांनी म्हटले.
सरकारी वकिलांनी म्हटले की, मुख्य आरोपी आणि या आरोपीचे संभाषण पोलिसांना मिळाले आहे. सीसीटीव्ही फूटेजही मिळाले असून दोन्ही आरोपींची समोरासमोर बसून चौकशी करायची असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, आरोपी संदीप गोडबोले हा एसटी कर्मचारी नसून सदावर्ते यांच्यासोबत असणारी व्यक्ती आहे. त्याने एलएलएमचे शिक्षण घेतले असून वकिलीची सनद घेतली नसल्याचेही समोर आले. दरम्यान, मुख्य आरोपी असलेले ऍड. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले असून आणखी एका प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.