मुंबई – भारताचा नवोदित अष्टपैलू क्रिकेटपटू दीपक चहर याला दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. आता त्यापेक्षा जास्त मोठा धक्का भारतीय संघालाच बसला असून, येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होत असलेल्या विश्वकरंडक टी-20 स्पर्धेतही तो खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरत असताना दीपकला पुन्हा दुखापतीचा सामना करावा लागला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे चहरला किमान चार महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे.
पाठीच्या दुखापतीतून सावरत त्याने नेटमध्ये गोलंदाजीलाही सुरुवात केली होती. मात्र, त्याला पुन्हा त्रास जाणवू लागल्याने त्याचे स्कॅनिंग करण्यात आले व यातूनच त्याची दुखापत बळावल्याचे समोर आले. त्याला यंदाच्या आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने तब्बल 14 कोटी रुपयांना खरेदी केले होते. चेन्नईलाही त्याच्या दुखापतीचा फटका बसला आहे.