नगर – नगर अर्बन बँक गैरव्यवाहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत तत्कालीन दोन संचालकांना मनेष साठे व अनिल काेठारी यांंना अटक केली होती. या दोघांनाही २ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व १५० कोटींचा घोटाळाबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी फिर्याद दिली होती. आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करत आहेत. बँकेमधील सर्व कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडिट झाले असून त्याचा अहवालही मागील महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे.
याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने याआधीच दोघांना अटक केली आहेच, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. आता मनेष साठे व अनिल काेठारी या संचालकांना ताब्यात घेतले होते. त्यांना पोलीस न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आता तत्कालीन संचालकांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली असल्याने इतर संचालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही संचालक परार झाले असून अनेकांचे फोन स्विच ऑफ झाले आहेत, अशी चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान पोलिसांकडून कारवाई सुरु झाल्याने ठेवीदारांना न्याय मिळेल अशी, भावना व्यक्त होत आहे.