पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शिवाजीनगर न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच रात्री १२.३० वाजता सुनावणी झाली. पिंपरी-चिंचवडमधील सेवा विकास सहकारी बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणात रोझरी स्कूलचा संचालक विनय अऱ्हाना आणि अॅड. सागर सूर्यवंशी यांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) गुरुवारी (दि.२८) अटक केली.
ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना रात्री उशिरा विशेष न्यायालयापुढे हजर करण्यात आले. विशेष न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी रात्री १२:३०च्या सुमारास सुनावणी घेऊन दोन्ही आरोपींना दि. ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इतिहासात रात्री उशिरा सुनावणी घेतल्याच्या घटना दुर्मीळ आहेत.
अऱ्हाना याला सीआयडीने अटक करण्यापूर्वी तो अंमलबजावणी संचालनालयाच्या (इडी) कोठडीत होता, त्याच्यावर सेवा विकास बँक व कॉसमॉस बँकेची फसवणूक, कुख्यात अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळण्यास मदत करणे, यांसह विविध गुन्हे दाखल आहेत.
त्यापैकी सेवा विकास बँक फसवणूक प्रकरणातील एका गुन्ह्याचा तपास सीआयडीकडून केला जात आहे. त्याविरोधात अऱ्हानाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर उच्च न्यायालयाने या गुन्ह्याची एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्याला सीआयडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने सीआयडीच्या बाजूने निकाल दिल्यावर या गुन्ह्याचा तपास सुरू झाला. यामध्ये अऱ्हाना व सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली आहे.
कोर्टात काय झाले?
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार विनय अऱ्हाना इडीच्या कोठडीत होता. सेवा विकास बँक फसवणूक प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यासाठी सीआयडीने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून प्रॉडक्शन वॉरंट घेतले. त्यानुसार अऱ्हाना आणि सागर सूर्यवंशी यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले.
परंतु, ठेवीदारांचे फसवणूक प्रकरण असल्याने एमपीआयडी कायद्यानुसार त्यांना विशेष न्यायालयापुढे हजर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिले. त्यामुळे अऱ्हाना व सूर्यवंशी यांना १२:३०च्या सुमारास विशेष न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्यापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपींना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारी पक्षातर्फे मारूती वाडेकर यांनी काम पाहिले.
बँकेचा कथीत घोटाळा…
पिंपरीत मुख्यालय असलेल्या सेवा विकास बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज प्रकरणे मंजूर करत ४२९ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष अमर मूलचंदानी, विनय अऱ्हाना, विवेक अऱ्हाना यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल करून अटकेची कारवाई करण्यात असून, आरोपींच्या मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल १२४ कर्जांची वसुली झाली नसल्याने बँकेच्या हजारो ठेवीदारांचे नुकसान झाले आहे.