जेजुरी/बेलसर (वार्ताहर) -शिवरी (ता. पुरंदर) येथून एका शेतकर्याच्या गोठ्यातून दोन जर्सी गायींची दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजी चोरी झाली होती. या प्रकरणी जेजुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे आणि पोलीस पथकाने कसून तपास करून बारामती, फलटण येथून तिघा चोरट्यांना जेरबंद करून गायी ताब्यात घेतल्या असून टेम्पोही जप्त करण्यात आला आहे. आरोपींना सासवड न्यायालयाने पोलीस कोठडी सुनवली असून त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे वाघचौरे यांनी सांगितले.
सागर अशोक गोलांडे (वय 34 रा. साबळेवाडी .ता बारामती), रवींद्र ठकसेन रायते (वय 29 रा. गुणवरे, ता. फलटण), गणेश शंकर भोसले (वय 24 रा .मठाचीवाडी ता फलटण, जि. सातारा) या तिघा सराईत गुन्हेगारांना जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील शिवरी येथील शेतकरी प्रशांत शंकर लिंभोरे यांच्या गोठ्यातून दि 21 ऑक्टोंबर 2023 रोजी प्रत्येकी 68 हजार रुपये किमतीच्या दोन गायी चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. याबाबत त्यांनी जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती.
दरम्यान, पोलिसांच्या तपासामध्ये चोरीला गेलेल्या एका गायीच्या कानातील अनुदान बिल्ला ट्रान्स्फर यावरून जेजुरी पोलिसांनी सागर गलांडे यास ताब्यात घेतले असता त्याने गाय चोरी केल्याचे कबुल केले. तसेच त्याच्या आणखी दोन साथीदारांना ताब्यात घेतले. या चोरट्यांनी मठाचीवाडी आणि साठेवाडी (ता. फलटण) येथे दोन्ही गायींची विक्री केली होती. या विक्री केलेल्या दोन्ही गायी ताब्यात घेवून संबधित शेतकर्यांच्या ताब्यात दिल्या.