मुंबई – 2008च्या बॅचचे आयआरएस अधिकारी अमित घावटे यांची एनसीबी मुंबईच्या विभागीय संचालक पदी नियुक्ती झाली आहे. एनसीबीच्या केंद्रीय कार्यालयाकडून एक पत्रक जारी करत याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. अमित घावटे यांच्याकडे बंगळुरू झोनल युनिटचा अतिरिक्त कारभार देखील असणार आहे.
समीर वानखेडे यांना एनसीबी मुंबईच्या विभागीय संचालक पदावरून हटवल्यानंतर एनसीबी मुंबईची धुरा कोणत्या अधिकाऱ्याकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर एनसीबी मुंबईला नवीन झोनल डायरेक्टर मिळाले आहेत.
मुंबई ते गोवा जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रुझवर कारवाई केल्यानंतर समीर वानखेडे व एनसीबी मुंबई चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यामुळे कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा तपासाचे अमित घावटे यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
दरम्यान, या प्रकरणात एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केले असल्याचे म्हटले जात होते. मात्र, या अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा आणि आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा काहीही संबंध नसल्याचे एनसीबी अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.