मुंबई – बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट काल 5 नोव्हेंबरला देशभरातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती.
मात्र, अखेर काल भारतासह इतर अनेक देशातील जवळपास 4 हजार स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर ‘सिद्धार्थ जाधव’ या मराठमोळ्या अभिनेत्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. सूर्यवंशी चित्रपटात एक लहानशी भूमिका असूनही या अभिनेत्याने बरीच प्रशंसा मिळवली आहे.
सिद्धार्थ जाधवच्या या अनपेक्षित सरप्राईजने रसिक सुखावून गेले आहेत. खरे तर सूर्यवंशी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आणि प्रमोशन मध्ये सिद्धार्थ कुठेच दिसला नव्हता. पण सिद्धार्थची
भूमिका मात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडली असल्याचे सध्या दिसत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर सिद्धार्थच्या चित्रपटातील भूमिकेचे फोटो शेअर करत कौतुक केले आहे. यापूर्वी देखील सिद्धार्थ ‘सिंबा’ चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह सोबत झळकला होता.