पंजाब – बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट 5 नोव्हेंबरला देशभरातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून करोनामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती.
अखेर (दि. 5) भारतासह इतर अनेक देशातील जवळपास 4 हजार स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र, पंजाबमध्ये या चित्रपटाला विरोध होताना दिसत आहे. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांच्या अडचणी वाढू शकतात. पंजाबच्या शेतकरी संघटनेने या चित्रपटाला विरोध सुरू केला आहे. बॉयकॉट सूर्यवंशीचा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू झाला आहे.
पंजाबच्या किसान मोर्चाने या चित्रपटावर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असलेल्या जवळीकतेमुळे चित्रपटाला विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हा विरोध आणखी वाढणार असल्याचेही बोलले जात आहे.