फुरसुंगी – हडपसर-सासवड पालखी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असताना तुकाईदर्शन-शनिमंदिर ते दिवेघाट दरम्यान या मार्गावर जागोजागी खड्डे, अरुंद रस्ता तसेच साइडपट्ट्याही उखडल्या आहेत. रस्ता नाही तर किमान साइडपट्ट्यांची दुरुस्ती तरी करणे गरजेचे असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाचे याकडेही दुर्लक्ष आहे.
हडपसर-सासवड महामार्गावर तुकाईदर्शन, भेकराईनगर, पॉवर हाऊस, उड्डाणपूल, मंतरवाडी चौक, कापड मार्केट, उरुळी देवाची चौक ते वडकीनाला, दिवेघाटापर्यंत महामार्गाच्या साइडपट्ट्या उखडल्या आहेत. यावरून दुचाकीच नव्हे तर चारचाकी अवजड वाहनेही घसरून अपघात होत आहेत. अनेक ठिकाणी साइडपट्ट्याच उरलेल्या नाहीत. अनेक ठिकाणचे भराव खचले आहेत. तुकाईदर्शन ते दिवेघाट या टप्प्यामध्ये संपूर्ण महामार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे.
महामार्ग अरुंद असल्याने ओव्हरटेक करताना वाहने रस्त्याच्या साइडपट्टीवरून खाली उतरल्यानंतर पुन्हा वाहन रस्त्यावर घेताना अपघात होत आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गेल्यावर्षी या पालखी मार्गाची हवाई पाहणी केली होती. तसेच, आढावाही घेत या रस्त्याच्या कामाच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास केल्या होत्या. त्यानंतरही या रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सातत्याने गडकरी यांना ई-मेल, ट्विटर यावर तक्रारी केलेल्या आहेत. राजकारणातून या रस्त्याचे रुंदीकरण तसेच डांबरीकरण रखडले आहे का? रस्त्याचे काम केव्हा होणार, असा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.
वाहन चालकांना या मार्गावरून अपघातांना सामोरे जावे लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मार्गाची दुरुस्ती करून साइडपट्यांच्या दुरूस्तीचे काम करावे, याबाबत प्रशासनास तसेच महापालिकेसही निवेदन दिले आहे.”- संदीप हरपळे, माजी उपसरपंच, फुरसुंगी
- हे लक्षात घ्यावे…
- सासवडपर्यंत रस्त्याच्या साइडपट्ट्या खाली-वर
- तुकाई दर्शन ते दिवेघाट टप्पा धोकादायक
- डागडुजी करताना डांबराऐवजी मुरमाचा वापर
- पावसाळ्यात साइडपट्ट्यांची दुरवस्था