श्रीकांत कात्रे
खोबऱ्याच्या किसाला मागणी असते, हे सहजासहजी कुणाच्या लक्षात येत नाही. पण सौ. श्वेता काकडे यांनी त्यातला व्यवसाय हेरला. खोबऱ्याच्या किसाची विक्री करून त्यांनी व्यवसायाची सुरवात केली. आणि आता त्यांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची चव लोकांच्या जिभेवर रेंगाळू लागली आहे. कष्ट आणि मेहनतीने तसेच अत्याधुनिक मशिनरीचा उपयोग करत त्यांनी हळूहळू व्यवसायाचा विस्तार केला.
पुण्यातील जुनी सांगवी येथील श्वेता काकडे यांनी कल्पकतेने आपल्या व्यवसायाची उभारणी केली. शहरातील महिलांना नोकरी किंवा इतर व्याप सांभाळताना खोबरे किसणे किंवा त्याचे तुकडे करणे, स्लाइस करणे, खारीक-खोबर, गूळ, डिंक, डाळ, तांदूळ, चकलीची- थालिपीठाची भाजणी, अनारशाचे पीठ दळणे किंवा अगदी शेंगदाण्याचे कूट करणे अशा छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी करणेही कठीण होऊन बसते. त्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळे अशा तयार किसाची, पीठाची, कुटाची, भाजणीची त्यांना गरज असते. हीच गोष्ट श्वेता काकडे यांनी हेरली. खोबऱ्याचा किस तयार करण्यापासून त्यांनी सुरवात केली.
आज विविध प्रकारची पिठे, भाजण्या किंवा अन्नप्रक्रियेतील महत्त्वाचे गरजेचे घटक तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे. काही तरी वेगळे करण्याचे त्यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. संगमनेर त्यांचे गाव. आईवडिल प्राथमिक शिक्षक हिरा व काशीनाथ मांढरे. आजूबाजूचे व्यापारी- व्यावसायिकांचे वातावरण पाहिल्यामुळे लहानपणापासूनच व्यवसायाची बिजे मनात रुजली होती. बी. टेक. (ऍग्रिकल्चर) झाल्यानंतर बंगळुरूला त्या एम. टेक. झाल्या. दहा वर्षे नोकरीहीकेली. अन्नप्रक्रिया उद्योगातील अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. इतर महिलांनाही स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करता आली पाहिजे, या विचारांतून त्यांनी स्वतंत्रपणे अन्नप्रक्रिया उद्योगात काम करण्याचे निश्चित केले. खोबऱ्याचा किस तयार करण्याचे मशीन त्यांनी घेतले. खोबऱ्याचा तयार किस गरजूंना उपलब्ध करून देण्यास सुरवात केली. नंतर व्हेजिटेबल कटर, आटाचक्की, ग्राइंडर अशा मशिन्स त्यांनी घेतल्या.
खोबऱ्याच्या किसाबरोबरच भाज्या, कांदा, वांगी, टोमॅटो कापून देणे, काकडी, गाजर, बीट, कांदा, टोमॅटो स्लाइस करून देणे, बटाट्याचा किस, चिप्स किंवा वेफर्स तयार करणे, सोललेला लसूण पॅकिंग करून पुरवणे अशा एकेक गोष्टी हळूहळू सुरू झाल्या. महिलांच्या गरजा ओळखून एकेक गोष्टीची भर व्यवसायात पडू लागली. शेंगदाणा, खोबरं- लसूण, उपवासाची स्पेशल चटणी अशा विविध प्रकारच्या चटण्या, खारीक- खोबरे दळणे, डिंक लाडू, शेंगदाणे, काजू, बदाम, पिस्ता कूट करून देणे अशा कामाला गती मिळत गेली. सौ. श्वेता काकडे आणि सौ. सुजाता अतकरे यांनी मिळून या व्यवसाय वाढवला. दिवाळीत करंजीला सारण लागते.
हे तयार सारण त्या देऊ लागल्या. मग केवळ दिवाळीपुरते नव्हे तर बाराही माहिने अशा स्वरूपाचे घटक पदार्थ त्या उपलब्ध करून देऊ लागल्या. दोन बचत गटांना काम दिल्यामुळे महिलांनाही रोजगार उपलब्ध होऊ लागला. जुनी सांगवी भागात एक मल्टिपरपज दुकान त्यांनी सुरू केले. तिथे स्वतंत्र किचन तयार केले. महिलांना काम मिळाले. त्यातून व्यवसायही बहरत गेला. या प्रवासात माणदेशी फाउंडेशनने त्यांना मोठे पाठबळ दिले.
आर्थिक साह्याबरोबरच व्यवसायासाठी आवश्यक अशा इतर सर्व बाबींचे मार्गदर्शन माणदेशीकडून मिळाल्याने व्यवसायाला योग्य दिशा
मिळाली. घरगुती स्वरूपात फराळाचे पदार्थ तयार करणाऱ्या महिलांना या घटक पदार्थांचा पुरवठा होऊ लागला. काही जण पोत्याने खोबऱ्याचा किस नेऊ लागले. तीच स्थिती इतर घटकांची झाली. श्वेता यांच्या दुकानात काकडे फूडसेया ब्रॅंन्डने विविध भाजण्या, वेगवेगळी पिठे, फराळाचे पदार्थ, उपवासाचे पदार्थ, 18 प्रकारची धान्य एकत्र करून बनविलेला मल्टिग्रेन आटा, रोस्टेड सोयाबीन असे पदार्थ उपलब्ध होतात. हे सर्व तयार करताना पदार्थ पौष्टिक असेल याबाबत काळजी घेतली जाते.
मार्केटिंगसाठी संपर्क उपयोगी पडतो. त्याशिवाय घरोघरी उत्पादन पोहचविले जाते. विविध प्रदर्शनांमधून त्यांच्या उतापदनांची माहिती ग्राहकांना मिळते.आता व्यवसायात जम बसला आहे. हे सारे त्यांनी जिद्दीने उभे केले आहे. सातत्याने कष्ट करून व्यवसायाची व्याप्ती वाढवली आहे. घरकाम सांभाळून हा सारा व्यवसाय सांभाळताना दिवस कसा संपतो, हे श्वेता यांच्या लक्षातही येत नाही. आणखी काही मशिनरी घेऊन औद्योगिक वसाहतीत फूड इंडस्ट्रिजची कंपनी सुरू करायची असे त्यांचे स्वप्न आहे. व्यवसायात झोकून देऊन काम करत आत्मनिर्भर होण्याबरोबरच इतर महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी श्वेता यांनी केलेली वाटचाल इतरांनाही स्फूर्ती देणारी आहे.