पाटण -पाटण शहरात तीन दिवसांपूर्वी करोनाबाधित रुग्ण सापडल्याने चव्हाणगल्लीचा संपूर्ण परिसर प्रशासनाने सील केला आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पाटण शहरात सर्वत्र शुकशुकाट पसरला असून शहरातील व्यापारी, दुकानदारांनी लॉकडाऊनला शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे.
केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व नागरीक घरीच थांबले असल्याने शहरातील रस्ते मात्र निर्मनुष्य झाले आहेत.
खुद्द पाटण शहरातही तीन दिवसांपूर्वी करोनाबाधित रुग्ण सापडल्याने चव्हाणगल्लीचा संपूर्ण परिसर प्रशासनाने सील केला आहे. या बाधित रुग्णाच्या दोन नातेवाईक व संपर्कात आलेल्या व्यक्तींचा स्वॅप घेवून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या अहवालाकडे संपूर्ण पाटण शहराचे लक्ष लागून राहिल होते.
मात्र, त्या बाधिताच्या दोन नातेवाईकांचा स्वॅप निगेटिव्ह आल्याने शहरातील नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्याच्या इतर संपर्कातील व्यक्तींचा अहवाल अद्यापही आला नसल्याने शहरातील नागरीकांची धास्ती कायम आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी करोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहरात अजूनही नागरीक भितीच्या छायेखाली वावरत आहेत. त्यामुळे पाटण शहरातील नागरीक धास्तावले असून विनाकारण बाहेर फिरणारांची संख्याही कमी आहे.
सध्या पाटण शहरातही कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. पाटण शहरातील मुख्य सोमवारपेठेकडे जाणारा रस्ता, झेंडाचौक, चव्हाणगल्ली परिसर बंद करण्यात आला आहे. पाटण नगरपंचायतीकडूनही सातत्याने बाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. शहरातील प्रत्येक घडामोडीकडे नगराध्यक्ष संजय चव्हाण व मुख्याधिकारी अभिषेक परदेशी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्यांच्यावर पाटण पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. तर ना. शंभूराज देसाई सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.