पिरंगुट (वार्ताहर) – उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी घेतली जाणारी पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. तथापि, संस्थेच्या वतीने डिजिटल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 22 ते 27 जुलैदरम्यान विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी ऑनलाइन विविध कार्यक्रम घेतले आहेत, अशी माहिती संस्थेचे मानद सचिव ऍड. संदीप कदम यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव उपस्थित होते. याबाबत ऍड. कदम म्हणाले की, दरवर्षी दादांच्या वाढदिवसानिमित्त देशातील युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येते; परंतु यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी संस्थेच्या वतीने ‘ऑनलाइन अनंत व्याख्यानमाला’ व विविध वेबिनार उपक्रमांचे आयोजन केले आहे.
सप्ताहाचे उद्घाटन बुधवारी (22 जुलै) राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे तर समारोप समारंभ सोमवारी (27 जुलै) खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत वेबिनारमध्ये होणार आहे. 22 जुलैला राष्ट्रीय वेबिनारमध्ये वाय. सी. एमचे डॉ. प्रवीण सोनी आणि डॉ. सागर पाठक यांचे करोनाविषयी तर 23 जुलैला इंग्लंडचे डिजास्टर मेडिसीनचे संचालक डॉ. पीटर पटेल यांचे ‘रोल ऑफ फार्मा प्रोफेशन इन डिजास्टर मेडिसीन’ विषयावर व्याख्यान होईल.
ऑनलाइन अनंत व्याख्यानमालेत 22 जुलैला विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांचे ‘उच्च शिक्षणातील आव्हाने व संधी’, 23 जुलैला एमकेसीएलचे अध्यक्ष विवेक सावंत यांचे ‘उद्योजकता व संगणक क्षेत्र’, 24 जुलैला मुंबईतील डॉ. हरिष शेट्टी यांचे ‘मेंटल – इकॉनोमिक हेल्थ स्ट्रेस अँड रिमेडी, 25 जुलैला माजी खासदार वंदनाताई चव्हाण यांचे पर्यावरण तर 26 जुलै रोजी बार कौन्सिल ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष ऍड. सतीश देशमुख यांचे कायद्यासंदर्भातील विषयांवर व्याख्यान होणार आहे.
22 जुलैला संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला व निबंध स्पर्धा होईल. कर्मचाऱ्यांसाठी 24 जुलैला न्यू वर्ल्ड संस्थेचे संस्थापक दत्ता रोकडे यांचे ध्यानधारणा विषयावर मार्गदर्शन आहे.
25 जुलैला विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी घर किंवा परिसरात वृक्षारोपण करून त्याच्या संवर्धनाची शपथ घेणार आहे. 26 जुलै रोजी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करोनावर ई -पोस्टर स्पर्धा होणार आहे. सांगवीच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या वतीने संस्थेतील शिक्षक व प्राध्यापकांकरिता ऑनलाइन शैक्षणिक साहित्य निर्मिती संबंधित शैक्षणिक ई-कन्टेन्ट व व्हिडीओ तयार करणे ही स्पर्धा होईल. संस्थेच्या महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तरच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी जॉब पोर्टल तयार केले जाईल.
विधायक उपक्रम बारामतीत राबविणार
उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद यांची माहिती
बारामती (प्रतिनिधी) –उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकसष्ठीनिमित्त करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहिर कार्यक्रम न करता विविध विधायक उपक्रम राबविणार असल्याचे दि मुस्लीम को-ऑप बॅंक पुणेचे संचालक अल्ताफ सय्यद, बारामती नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता बालनिरीक्षक गृह येथील मुलांना अन्नदानाचा व केक कापण्याचा कार्यक्रम, त्याचदिवशी दुपारी चार वाजता एकता महिला नागरी सहकारी पतसंस्थेत अन्नधान्याचे (जीवनावश्यक वस्तू) किटचे वाटप, 26 जुलै रोजी सकाळी मोरगांव रोड येथील विविध भागात वृक्षारोपण व सायंकाळी एकता महिला नागरी सहकारी पतसंस्थेत कोविड-19च्या आपत्ती काळात पत्रकार बांधवांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात येणार आहे. 27 जुलै रोजी बारामती नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना अर्सेनीक अल्बमच्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. 30 जुलै रोजी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांना मोफत स्वेटर वाटप. 31 जुलैला मुख्य शाखा भवानी पेठ पुणे येथे दि मुस्लीम को ऑप बॅंकेच्या 27 शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांना मोफत फेसशिल्ड व मास्क वाटप करण्यात येणार आहे.