पुणे – प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील निवडक दुकाने आता 12 तास सुरू ठेवता येणार आहेत. सकाळी सात ते सायंकाळी सात अशी दुकानांची वेळ असेल, असे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात मात्र सकाळी 10 ते दुपारी दोन याच वेळी जीवनवश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवता येतील.
शहरात दुकाने सुरू राहणार अशी घोषणा महापालिका आयुक्तांनी केली परंतु त्याबाबत स्पष्टता नसल्याने गोंधळाचे वातावरण होते. ते दूर करण्यासाठी त्यांनी वेळापत्रक तयार करून तसे आदेशच काढले. याबाबत पोलीस प्रशासनाशी चर्चा केली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
फिजिकल डिस्टन्सिंग संदर्भातील नियम पाळणे दुकानदारांसाठी बंधनकारक आहे. कोणत्याही दुकानामध्ये गर्दी होऊ नये याची काळजी, संबंधित दुकान चालकाने घ्यायची आहे, असेही यात स्पष्ट केले आहे.
दुकानदाराने ओळखपत्र द्यावे
कामगारांना दुकान व्यावसायिकाने दिलेले ओळखपत्र आवश्यक आहे. त्यामुळे पोलीसांनी दुकानांच्या कामगारांना अडवू नये, अशा सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत.
महत्त्वाचे रस्ते बंदच!
लक्ष्मी रस्ता, अप्पा बळवंत चौक, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, एमजी रस्ता, कोंढवा रस्ता, एनआयबीएम रस्ता या रस्त्यांवरील अत्यावश्यक वस्तूंची वगळता अन्य दुकाने बंद राहतील.
प्रतिबंधित क्षेत्रासाठी नियम
सकाळी 10 ते दुपारी दोन या कालावधीत दूध, भाजीपाला, फळे, मटण व चिकनची दुकाने सुरू राहतील.दवाखाने, रुग्णालये, प्रसुतिगृहे आणि मेडिकल दुकाने सुरू राहतील.
वेळापत्रक
सोमवार, बुधवार, शुक्रवार : इलेक्ट्रॉनिक दुकाने, संगणकीय अनुषंगिक साहित्य साधने -सामग्री, मोबाइल विक्री व दुरुस्ती, इलेक्ट्रिक वस्तू विक्री व दुरुस्ती, भांड्याची विक्री दुकाने
मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार : वाहनांची दुरुस्ती गॅरेज, हार्डवेअर, प्लंबिग, बांधकाम साहित्य साधन सामग्री, कपड्यांची दुकाने, डेअरी उत्पादने