नवी दिल्ली – करोना विषाणूमुळे देशभरात 548 डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे. या आकडेवारीमध्ये प्रत्यक्ष काम करणारे कामगार, वॉर्ड बॉय, स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक, प्रयोगशाळा सहायक , शिपाई, लॉन्ड्री आणि स्वयंपाकघरातील कर्मचाऱ्यांचा समावेश नाही.
यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या रुग्णालयातील संसर्ग झालेल्या डॉक्टर, नर्स आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना कोठून संसर्ग झाला, याचा शोध घेतला गेलेला नाही. त्यामुळे या सर्वांचा किती जणांशी संपर्क आला होता, याचीही नोंद ठेवले गेलेली नाही, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
करोना विषाणूची लागण झालेल्या काही डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. मात्र अशा डॉक्टरांचा नेमका आकडा उपलब्ध नाही. दिल्लीतील 69 डॉक्टरांना आतापर्यंत संसर्ग झाला आहे. तर डॉक्टरांव्यतिरिक्त 274 नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.