उत्तर प्रदेशातील आग्रा येथे चपला बनवणाऱ्याने आपल्या गर्भवती पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेनंतर हत्यारा पती स्वत: पोलीस ठाण्यात पोहोचला आणि पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून अधिक चौकशी सुरू आहे. चौकशीत आढळून आले की, प्रेमविवाह केल्यानंतर प्रवीण पत्नीच्या कुटुंबीयांकडे प्लॉटची मागणी करत होता. यावरून मंगळवारी रात्री भांडण झाल्यानंतर त्याने झोपलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केला, नंतर चाकूने गळ्यावर वार केले. नयना असे मृत विवाहितेचे नाव असून प्रवीण असे खून करण्याऱ्या पतीचे नाव आहे.
मुलीच्या आनंदासाठी प्रेमविवाह मान्य केला –
मृत नयना यांच्या आईने पोलिसांना सांगितले की, दोन वर्षांपूर्वी मुलगी नयनाची काॅलेजमध्ये असताना मित्रांच्या माध्यमातून प्रवीणशी मैत्री झाली होती. दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. याबाबत घरच्यांना काहीही माहिती नव्हती. दोघांनी 10 महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न केले होते. याबाबत आम्ही पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. मात्र नंतर मुलीच्या सुखासाठी आम्ही दोघांचे नाते मान्य केले. त्यांनी प्रेमविवाह केल्याच्या एका महिन्यानंतर सर्व विधिनुसार त्यांचे लग्न लावण्यात आले. तसेच जावयाला दुचाकी व इतर वस्तू दिल्या.
लग्नानंतर काही दिवसांतच प्रवीणने नैनाचा छळ सुरू केला. आमच्या तीनपैकी एक भूखंड त्याच्या नावावर करण्याचा दबाव तो टाकत होता. तो आपल्या मुलीशी भांडायचा. चार महिन्यांपूर्वीही भांडण झाले होते. याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी कारवाई केली. पुन्हा 15 दिवसांपूर्वी त्याने नयनाला फाशी देण्याचा प्रयत्न केला होता. मुलीने पळून जावून आपला जीव वाचवला. अखेर त्याने मुलीचा जीव घेतलाच. ती पाच महिन्यांची गर्भवती होती, असे मृत नयनाच्या आईने पोलिसांना सांगितले आहे.
माझ्याशी खूप भांडायची, मीच ठार केलं तीला –
पत्नी नयनाचा खून करून आरोपी पती प्रवीण पोलिस स्टेशनला आला. त्याने पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले की मी माझ्या पत्नीचा खून केला आहे. माझ्याशी ती खूप भांडायची तीला आता कायमचं शांत केले आहे. स्टेशन प्रभारी निरीक्षक भानू प्रताप सिंह यांनी सांगितले की, या घटनेसंदर्भात प्रवीणची चौकशी करण्यात आली असून पत्नीची हत्या केल्याचे त्याने मान्य केले आहे.
तीन पिढ्यांमध्ये नयना ही एकुलती एक मुलगी होती –
मृत मुलीच्या आईने सांगितले की, माझे पती आजारी आहेत काम करू शकत नाहीत. आम्हाला तीन मुलगे आणि एक मुलगी होती. नैना ही आमच्या तीन पिढ्यांमध्ये ती एकटीच मुलगी जन्माला आली होती. नयनाच्या शिक्षणासाठी मी मजुरीचे काम करायचे. प्रेमविवाहानंतर ती सुखात जगेल अशी अपेक्षा होती, पण प्रवीणने नैनाचा जीव घेतला. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे.