नवी दिल्ली – हरियाणातील काही महिला शेतकऱ्यांनी आज कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि त्यांच्या परिवाराशी संवाद साधला. यावेळी काही महिलांनी, आता राहुल यांचे लग्न करा, अशी सूचना त्यांना केली. त्यावेळी, तुम्हीच त्यांच्यासाठी मुलगी शोधा, अशी सूचना सोनिया गांधी यांनी केली. यावेळी राहुल गांधी यांनी होईल, असे संक्षिप्त उत्तर देत त्यांना प्रतिसाद दिला.
या शेतमजूर व शेतकरी महिलांसाठी सोनिया गांधी यांनी त्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन आयोजित केले होते. राहुल गांधी यांनी त्यांच्या हरियाणातील सोनिपत जिल्ह्यातील दौऱ्याच्या वेळी तेथील शेतात काम करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना सोनिया गांधी यांची भेट घडवून देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार आज त्यांनी ही भेट घडवून आणत आपला शब्द पाळला. यावेळी राहुल व प्रियांका हेही उपस्थित होते.
8 जुलै रोजी राहुल गांधींनी सोनीपतमधील मदिना गावात अचानक थांबून तेथील भातलागवडीच्या वेळी काम करणाऱ्या शेतकरी व मजूर महिलांची भेट घेतली होती. तेथे त्यांनी स्वतःही भातलागवड करीत त्या महिलांसोबत जेवणही घेतले होते. तेव्हा राहुल गांधींनी त्यांना ‘दिल्ली दर्शन’साठी दिल्लीला आमंत्रित करण्याचे आश्वासन दिले होते. या महिलांनी आजवर कधीही दिल्लीला भेट दिली नव्हती.