पुणे, दि. 6 -गायी-म्हशींचे दूध वाढविण्यासाठी महिलांच्या डिलिव्हरीसाठी वापरल्या जाणाऱ्या “ऑक्सीटोसीन’ इंजेक्शनची जिल्ह्यात सर्रास विक्री केली जात होती. हे इंजेक्शन दिलेल्या गायी-म्हशींचे दूध मानवी आरोग्यास हानीकारक बनले होते. या इंजेक्शनची बेकायदा निर्मिती आणि विक्री करणाऱ्या टोळीला अमली पदार्थ विरोधी पथक आणि अन्न औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करुन अटक केली आहे. त्यांच्याकडून 52 लाखांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
समीर कुरेशी, विश्वजीत नाना, मंगल गिरी, सत्यजीत मोंडल, श्रीमंत हल्दर आणि बाबुभाई उर्फ अल्लादीन (सर्व रा. कलवड वस्ती) अशी अटक आरोपींची नावे आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने निरीक्षक सुहास तानाजी सावंत (वय 43) यांनी फिर्याद दिली आहे.
“ऑक्सीटोसीन’ हे इंजेक्शन महिलांच्या डिलेव्हरी दरम्यान डॉक्टर वापरतात. यामुळे प्रसूती वेदना कमी होतात. मात्र हे इंजेक्शन गायी-म्हशींसाठी वापरल्यास त्या जास्त दूध देतात. याचा वापर मानवाव्यतिरीक्त इतरत्र करण्यास कायद्याने बंदी आहे. तसेच हे इंजेक्शन तयार करण्यासाठी आणि विक्रीसाठी औषध व सौंदर्यप्रसाधन कायद्यानुसार परवाना आवश्यक असतो. यातील आरोपींकडे कोणताही परवाना नसताना ते इंजेक्शनची बेकायदा निर्मिती आणि विक्री करत होते. याची खबर मिळताच अन्न व औषध प्रशासन आणि अमली पदार्थ विरोधी पथकाने सयुंक्त कारवाई केली. त्यांनी कलवडवस्ती येथील एका पत्र्याच्या शेडवर छापा मारुन इंजेक्शन निर्मितीसाठी लागणारे केमिकल आणि इतर साहित्य जप्त केले. तेथून पाचही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या चौकशी केली असता त्यांच्याकडे औषध निर्मिती आणि विक्रीचा कोणताही परवाना नव्हता.
गोठ्यात जाऊन डिलेव्हरी
तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांनी सांगितले, आरोपी मागील दोन वर्षांपासून हा व्यवसाय करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. ते शहर आणि ग्रामीण भागातील गोठ्यांमध्ये जाऊन त्यांची विक्री करत होते. अनेकदा गोठा मालकही त्यांच्याकडे येऊन इंजेक्शन घेऊन जात होते. इंजेक्शनने दूध वाढत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्याकडे ग्राहकांचा ओघ वाढू लागला होता. इंजेक्शनसाठी वापरल्या जाणाऱ्या 50 ऍम्बूसचे (केमिकल असलेली बाटली) बॉक्स ते 100 रुपयांना विक्री करत होते. यातील एकच आरोपी 12 वी पर्यंत शिक्षण घेतलेला आहे. इतर आरोपी अशिक्षित आहेत. त्यांचा एक मास्टर माईंड असून, तो त्यांना केमिकल आणून देत असे. यानंतर आरोपी त्याचे मिश्रण करुन ऍम्बुसमध्ये भरुन बॉक्स बनवत होते. या मास्टर माईंडचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरू आहे.
“ऑक्सीटोसीन’ इंजेक्शन दिलेल्या जनावारांपासून मिळणारे दूध मानवी आरोग्यास हानीकारक आहे. हे दूध पिल्याने श्रवण कमजोरी, दुुुुुष्टिहीनता आणि पोटाचे आजार होतात. या इंजेक्शनमुळे प्राण्यांनाही मोठा शारीरिक त्रास होतो. इंजेक्शनचा प्राण्यांवर वापर म्हणजे त्यांच्याशी क्रुरतेने केलेली वागणूक आहे. हे इंजेक्शन मानवासाठी वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरण्यास परवानगी आहे.
– सुहास सावंत, औषध निरीक्षक