बीड : सध्या कोरोनाला हरवण्यासाठी जगभरात अनेक प्रयत्न सुरु आहेत.या महामारीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. लोकांच्या मनात कोरोनाची भीती निर्माण झाली आहे. अशातच कोरोनाला घाबरुन एका 65 वर्षीय वृद्धाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील मंगेवाडी येथे हा खळबळजनक प्रकार घडला आहे. ‘मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे.’ , अशी सुसाईड नोट लिहून आसाराम रामकिसन पोटे (वय ६५) या वृद्धाने आत्महत्या केली आहे.
एकीकडे कोरनाचे संकट वाढत असताना कोरोनाची भीतीसुद्धा लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. आसाराम पोटे यांना कुठलाही आजार नव्हता. तसेच त्यांनी गेल्या काही दिवसांत कुठेही प्रवास केलेला नव्हता. एवढचं काय तर ते कोणत्याही नवीन व्यक्तीच्या संपर्कातही आले नव्हते. केवळ कोरोनाविषयी बाहेर चर्चा ऐकून आणि सद्य परिस्थिती पाहून त्यांनी आपल्या शेतात एका झाडाला गळफास लावून चक्क आपले आयुष्य संपवले.
आत्महत्येपूर्वी आसाराम यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमधूनच ही बाब समोर आली आहे. आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी आसाराम यांनी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली. ‘मी कोरोनाच्या भीतीमुळे फाशी घेत आहे. यामध्ये कोणाचाही दोष नाही’, असे त्यांनी या चिठ्ठीत लिहिले होते. त्यामुळे त्यांनी केवळ कोरोनाच्या भीतीपोटी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान या घटनेविषयी शहादेव पोटे यांनी पाटोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर घटनेचं वृत्त संपूर्ण तालुक्यात पसरले असून त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.