संगमनेर – संगमनेरमध्ये आणखी दोन करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोल्हेवाडी रोड येथील दीड वर्षीय मुलीला, तसेच नवघरगल्लीतील 32 वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यापूर्वी संगमनेरात मोमीनपुऱ्यात एका महिलेसह अडीच वर्षीय बालकाला करोनाची लागण झाली होती. आता त्यात आणखी एका लहान दीड वर्षीय बलिकेला करोनाची लागण झाली आहे. संगमनेरच्या रुग्ण संख्येत सलग बाराव्या दिवशी वाढ झाली असून, एकूण रुग्ण संख्या 55 वर पोहचली आहे.
संगमनेर शहरात 1 जून रोजी एका संशयिताला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याला नगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्याच्या संपर्कातील अन्य तिघांनाही जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यातील एकाच्या कुटुंबातील तिघांना करोना झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, सोमवारी (दि. 1) सापडलेल्या तरुणाला त्रास सुरू झाला. त्यांनतर तो अनेकांबरोबर जुगार खेळला असल्याची चर्चा रंगू लागली होती. आज मटकापेढी सांभाळणाऱ्या तरुणालाच करोना झाल्याचे समोर आले आहे.त्यामुळे या वक्तीच्या संपर्कात आलेल्या मटका खेळणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. दोन जण पॉझिटिव्ह सापडल्याने तालुक्यातील करोनाबधितांची संख्या 55 वर पोहचली असून, 27 जणांवर उपचार सुरू आहेत.
संपर्कात आलेल्यांची पाचावर धारण
नवघरगल्लीत सापडलेल्या करोनाबधिताच्या वडिलांची मटकापेढी असून, तो ही पेढी सांभाळत होता. याचबरोबर त्याचा अवैध दारूविक्रीचाही व्यवसाय आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांची मात्र पाचावर धारण बसली आहे.