15 रुग्णांचा मृत्यू : उपचाराधीन रुग्णांची संख्या पोहोचली 12953 वर
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने आज पुन्हा एक नवीन विक्रम केला. आज तब्बल 1881 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिवसागणिक बाधितांची संख्या वाढत असल्याने शहरवासियांची चिंता वाढली आहे. तर पालिका रुग्णालयातील बेड संपले असल्याने वैद्यकीय यंत्रणेवर ताण आला आहे. आजपर्यंत शहरातील 1 लाख 26 हजार 936 जणांना करोनाची लागण झाली आहे. तसेच शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 12953 वर जाऊन पोहोचली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, बुधवारी (दि. 24) चार वाजेपर्यंत शहरातील 1865 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 16 रुग्णाची नोंद झाली. तसेच दिवसभरात 15 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामध्ये शहरातील 10 तर शहराबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत 2758 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 1943 व शहराबाहेरील 815 जणांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरामध्ये 824 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 12 हजार 40 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 4133 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. अद्याप 1366 रुग्णांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 2054 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 10,899 वर पोहचली आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 12,953 इतकी आहे.
ब व ड प्रभागात 300 हून अधिक रुग्ण
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ब व ड प्रभागामध्ये 300 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. ब प्रभागामध्ये वाल्हेकरवाडी, काळेवाडी, तानाजीनगर हा भाग येतो. याठिकाणी तब्बल 386 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर ड प्रभागामध्ये पुनावळे, ताथवडे, पिंपळे निलख, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर हा भाग येतो. याठिकाणी 311 बाधितांची नोंद झाली आहे.