आणखी 3,509 नवे करोनाबाधित : 33 जणांचा मृत्यू
पुणे – शहरात करोना बाधितांचा उच्चांक झाला असून, गेल्या 24 तासांत 3 हजार 509 बाधितांची नोंद झाली आहे, तर तब्बल 33 बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यातील नऊ जण पुणे हद्दीबाहेरील आहेत.
दिवसेंदिवस बाधितांची संख्या वाढतच चालली असून, शहराची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेने सुरू झाली आहे. महापालिकेने सुरक्षेविषयक अनेक निर्बंध आणले आहेत; परंतु ते पाळण्याची मानसिकता अजूनही नागरिकांमध्ये नसून, ते नियम गांभीर्याने पाळले जात नसल्याचे रोज दिसून येत आहे.
आजपर्यंत 2 लाख 44 हजार 343 बाधितांची नोंद झाली असून, त्यातील 2 लाख 12 हजार 714 जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यात बुधवारच्या 1 हजार 410 जणांचा समावेश आहे.
बाधितांमधील 26 हजार 515 रुग्ण सक्रीय असून, त्यातील 589 रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत; तर 1 हजार 044 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आजपर्यंत 5 हजार 114 जण मृत्यूमुखी पडले आहेत, असे प्रशासनाने सांगितले.
चाचण्याही विक्रमी
बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता संशयितही वाढत चालले आहेत. बुधवारी आजपर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 16 हजार 185 संशयितांच्या स्वॅब टेस्ट करण्यात आल्या आहेत.