नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एक अल्पवयीन मुलगी तिच्या मित्रासह पार्कमध्ये बसलेली होती, ती घरी परतत असताना चौघे जण तिथे आले आणि त्यांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केला असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तर एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतल्या शाहबाद डेअरी भागात असलेल्या पार्कमध्ये २७ जूनच्या रात्री ही अल्पवयीन मुलगी तिच्या मित्रासह गेली होती. मित्राला भेटून आल्यानंतर हे दोघंही घरी परतत होते. त्यावेळी चौघे आरोपी तिकडे आले आणि त्यांनी तिच्याशी अश्लील वर्तन केले. तसंच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि तिथून पळ काढला. या घटनेनंतर पीडिता तिच्या घरी गेली. तिने कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती दिली.
कुटुंबीय मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात पोहचले. मुलीचा जबाब नोंदवून तक्रार नोंदवण्यात आली आहे. यानंतर घटनास्थळी पोलीस पोहचले त्यांनी तिथल्या लोकांची चौकशी केली. या घटनेनंतर पोलिसांनी कलम ३७६ ड (सामूहिक बलात्कार), कलम ३२३, कलम ३४ यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसंच पीडितेचं वय १६ असल्याने सेक्शन ६ च्या अन्वये POCSO च्या अंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे. शाहबाद डेअरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त रवि सिंग यांनी, ही घटना घडल्यानंतर आम्ही १९ वर्षांच्याआरोपीला अटक केली. त्याने त्याच्यासह जे इतर तिघे होते त्यांचीही माहिती दिली. आरोपींपैकी एक मुलगा अल्पवयीन आहे. त्यानंतर आम्ही इतर तिघांनाही अटक केली. हे सगळे शाहबाद डेअरी भागात राहणारे आहेत. सगळेच जण ड्रग्ज अॅडिक्ट आहेत अशीही माहिती पोलिसांनी दिली.