धक्कादायक !मुंबईतील ‘या’ प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दररोज ७ ते ९ हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत असून, मुंबईतील दररोजची रुग्णासंख्याही १ हजार पेक्षा जास्तच आहे. सरकारकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या सर्वात मुंबई मधून आता धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांना बीकेसी येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील करोना रुग्णसंख्या वाढीचा वेग झपाट्याने वाढला आहे. करोनाचा संक्रमण दर कमी झाल्यानंतर राज्यात दिवसाला २ ते ३ हजाराच्या सरासरीने रुग्ण आढळून येत होते. मुंबईतील रुग्णांचे प्रमाण घटले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून, मुंबईतही करोनाचा प्रसार वाढला आहे. दरम्यान मुंबईतील प्रसिद्ध राधाकृष्ण रेस्टॉरंटमधील १० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अंधेरीतील राधाकृष्ण रेस्टॉरंटमधील १० कर्मचारी करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. या रेस्टॉरंटमध्ये ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. करोना पॉझिटिव्ह निघालेल्या कर्मचाऱ्यांना बीकेसीतील जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून, इतरांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे रेस्टॉरंट दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. सॅनिटाइज केल्यानंतर आणि नवीन कर्मचारी आल्यानंतर पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.