सातारा – जिल्हा शासकीय रुग्णालयातील कक्षात जाऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांना दमदाटी, धक्काबुक्की तसेच शिविगाळ केल्याप्रकरणी आरोग्य विभागातील एका उपशाखेत काम करणाऱ्या राहुल जगताप (रा. सातारा, पूर्ण नाव, पत्ता नाही) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून निषेध करण्यात आला असून संशयितास तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील संशयित जगतापवर आणखी एक लुटमारीचा गुन्हा आजच दाखल झाला आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास कक्षात बसून शासकीय कामांचा निपटारा करत होते. यावेळी राहुल जगताप त्याठिकाणी आला व त्याने बाहेर थांबलेल्यांना दमदाटी करत त्यांच्याकडे असणारी कागदपत्रे फेकण्यास सुरुवात केली. बाहेर गोंधळ घातल्यानंतर डॉ. चव्हाण यांच्या कक्षात जगताप आला. त्याने डॉ. चव्हाण यांना शिवीगाळ, दमदाटी तसेच धक्काबुक्की करत कामात अडथळा निर्माण केला. आतील गोंधळ ऐकून जमलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी जगताप याला त्या ठिकाणाहून बाजूला नेले. याची तक्रार डॉ. चव्हाण यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली असून जगतापवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास उपनिरीक्षक बी. डी. मुसळे करीत आहेत.
अन्य एका घटनेत राहुल जगतापने जिल्हा रुग्णालयाच्या आवारात थांबलेल्या कारंडवाडी (ता. सातारा) येथील मंगेश उमेश चव्हाण या टेम्पोचालकास शिविगाळ व मारहाण केली. मारहाण करत असतानाच राहुल जगतापने दारुसाठी पैसे मागत चव्हाण यांच्याकडील पाचशे रुपये हिसकावून नेले. याची तक्रार मंगेश चव्हाण यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली असून जगतापवर जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचा तपास सहायक फौजदार डी. जी. पवार करीत आहेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घटनेचा निषेध
जिल्हा शल्यचिकित्सकांना झालेल्या धक्काबुक्की आणि शिवीगाळीचा निषेध जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी शुक्रवारी केला. याबाबतचे निवेदन डॉ. सुभाष चव्हाण यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी तसेच पोलिस अधीक्षक समीर शेख यांना दुपारी देण्यात आले. राहुल जगतापला तात्काळ अटक करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्सकांना त्यांच्याच विभागातील कर्मचाऱ्याने धक्काबुक्की शिवीगाळ केल्याने खळबळ उडाली आहे.