उद्धव ठाकरेंसाठी महादेवाला साकडे
कराड – राज्यात सत्तेचा तिढा वाढला आहे. भाजपने सत्तास्थापनेत नकार दर्शवल्याने आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच व्हावा आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत. यासाठी आज सोमवारी दि.11 रोजी दुपारी एक वाजता येथील कृष्णा घाटावरील संगमेश्वर मंदिरात शिवसैनिकांनी महादेवाच्या पिंडीस अभिषेक घातला.
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आले. त्यानंतर मुख्यमंत्री पदावरून सेना-भाजप आमने-सामने आले. ठरल्याप्रमाणे अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद सेनेला द्यावे यासाठी शिवसेनेने भाजपवर दबाव आणला. मात्र भाजपने सत्ता स्थापनेचा दावा न करता शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास नकार दर्शवला. त्यानंतर दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले.
त्यामुळे सोमवारी घडलेल्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा आणि यासाठी उद्धव ठाकरे यांचीच निवड व्हावी. यासाठी कराडमधील शिवसैनिकांनी प्रीतिसंगमावरील मंदिरांमध्ये अभिषेक व होमहवन केले. यावेळी शिवसेनेचे वाहतूक सेना उप जिल्हाप्रमुख दशरथ धोत्रे, कराड उप शहरप्रमुख कुलदीप जाधव, दिलीप यादव, विभाग प्रमुख महेश कोळी, संरक्षण कक्ष उप जिल्हाप्रमुख राजेंद्र माने, शिवसैनिक संभाजी जगताप, विशाल देशपांडे, राजेंद्र माने, पोपटराव कांबळे, दिलीप यादव, आदींसह महिला पदाधिकारी जिल्हा संघटिका अनिता जाधव, कलावती माळी, प्रतिभा नाईक, छायाताई गुरव, शोभा लोहार उपस्थित होत्या.