अभ्यासकांकडून नोंद : “सफर’कडून शहरातील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास
पुणे – दिल्लीपाठोपाठ आता देशातील इतर शहरांमधील हवेची गुणवत्ता खालावत असून, हवेच्या प्रदूषणात वाढ होत आहे. देशातील 4 प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या पुणे शहरातील हवेची गुणवत्ता सध्या “समाधानकारक’ असली तरी, हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढत असल्याची नोंद अभ्यासकांकडून करण्यात आली आहे.
देशातील दिल्ली, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या 4 शहरांत सातत्याने हवेच्या गुणवत्तेची नोंदणी केली जाते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी (आयआयटीएम) संस्थेच्या “सफर’ उपक्रमांतर्गत या शहरांमधील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला जातो. यापैकी दिल्ली शहरातील हवेची गुणवत्ता “घातक’स्तरावर पोहोचली असून, मुंबई आणि अहमदाबाद शहरातील हवेची गुणवत्तादेखील “वाईट’स्तरावर पोहोचली आहे. या शहरांच्या तुलनेत पुण्यातील हवेची गुणवत्ता “समाधानकारक’ असल्याचे निरीक्षण “सफर’तर्फे नोंदविण्यात आले आहे. हवेचा वाहता प्रवाह आणि तापमानातील वाढ हे यामागील प्रमुख कारण असल्याचे अभ्यासकांकडून सांगण्यात आले आहे.
मात्र, शहराच्या हवेची गुणवत्ता उत्तम असली तरी हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढत आहे. हवेतील पीएम 10 या प्रदूषकाचे प्रमाण 74 क्युबिक मीटर आहे, तर पीएम 2.5 या प्रदूषकाचे प्रमाण 45 क्युबिक घनमीटर इतके आहे. मात्र, ऑक्टोबर महिन्यात हे प्रमाण अनुक्रमे 35 आणि 20 इतकी होती. मात्र, हळू हळू वाढते थंडीचे प्रमाण, धुके आणि हवेतील जडपणाचे वाढते प्रमाण हे प्रदूषकांच्या वाढीचे मुख्य कारण असल्याचे निरीक्षण अभ्यासकांकडून नोंदविण्यात आले आहे.
शहरातील हवाप्रदूषणाची मुख्य कारणे
वाहनांचे उत्सर्जन
धूळ
औद्योगिक उत्सर्जन