मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेला विरोध करत असल्याबद्दल भाजपवर शनिवारी शिवसेनेकडून बोचरे शाब्दिक बाण सोडण्यात आले. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मनाने भरकटले आहेत. त्यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची वर्तणूक आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे.
वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी रिपब्लिक टीव्हीने पैसे थकवल्याने 2018 मध्ये आत्महत्या केल्याचा आरोप आहे. नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गोस्वामी यांना अटक करण्यात आली. मात्र, गोस्वामी यांच्या अटकेला विरोध दर्शवत भाजपने निदर्शनांचे सत्र सुरू केले. त्याचा समाचार शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून घेण्यात आला आहे.
पराभव समोर दिसू लागल्याने व्हाईट हाऊसमध्ये बसून ट्रम्प यांनी दादागिरीची भाषा सुरू केली आहे. ट्रम्प कधी मतमोजणी थांबवण्याची मागणी करत आहेत, तर कधी न्यायालयात जाऊन निकालास स्थगिती मिळवू पाहत आहेत. त्यांच्या प्रमाणेच भाजपचे नेते वागू लागले आहेत, असा शाब्दिक टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि त्यातून आत्महत्या घडणे हा एकप्रकारे सदोष मनुष्यवधासारखाच गुन्हा आहे. तसा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीविरोधात, मग ती लहान असो की मोठी; कायद्याने कारवाई व्हायलाच हवी. पण, भाजपला कायद्याचे राज्य मान्य असल्याचे दिसत नाही.
मुळात, कायदाच मान्य नसल्यासारखे भरकटलेले वर्तन भाजपचे नेते करत आहेत. पोलिसांनी एका आरोपीला पकडल्यावर भाजपचे नेते वेडेखुळे बनले आहेत, अशी बोचरी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.