संयुक्त राष्ट्र – संयुक्त राष्ट्राच्या व्यवस्थापकीय आणि अंदाजपत्रकीय प्रश्नांसंबंधीच्या सल्लागार समितीवर भारताच्या विदीशा मैत्र यांची वर्णी लागली आहे. ही समिती संयुक्त राष्ट्राच्या आमसभेशी संबंधित आहे.
संयुक्त राष्ट्रातील भारताच्या प्रथम सचिव असलेल्या मैत्र यांना आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांच्या गटात 126 मते मिळाली. व्यापक भौगोलिक प्रतिनिधीत्व, वैयक्तिक गुणवत्ता आणि अनुभवाच्या आधारे 193 सदस्यांच्या आमसभेकडून या सल्लागार समितीवरील सदस्यांची निवड केली जात असते.
आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांच्या गटातून दोन सदस्यांना या समितीवरील सदस्य म्हणून नामांकन मिळाले होते. त्यामध्ये मैत्र या एक आहेत. तर नामांकन मिळालेल्या इराकच्या अली मोहंम्मद फएक अल दबाग यांना 64 मते मिळाली. आमसभेच्या अंदाजपत्रक आणि व्यवस्थापकीय विषयांशी संबंधित या समितीवरील मैत्र यांचा कार्यकाल पुढील वर्षी 1 जानेवारीपासून सुरू होईल आणि त्या 3 वर्षे या समितीच्या सदस्या असतील.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेवर भारताला अस्थायी सदस्य म्हणून दोन वर्षांसाठी सदस्यत्व मिळाले आहे. त्या पार्श्वभुमीवर मैत्र यांची निवड ही भारतासाठी आणखी एक आनंददायी बाब आहे.