मुंबई – काँग्रेस हा आजही देशभरात जनमानसात मुळे घट्ट रुजलेला पक्ष आहे. सोनिया गांधी या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. आतापर्यंत त्यांनी पक्षाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. आता राहुल गांधी यांना पक्षात त्यांची एक मजबूत टीम तयार करावीच लागेल. तेच काँग्रेसपुढील प्रश्नचिन्हाचे ठोस उत्तर ठरू शकेल. असा सल्ला शिवसेनेने कॉंग्रेसला दिला आहे.
काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या जितीन प्रसाद यांच्या पक्षांतरावर भाष्य करत शिवसेनेने काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल हा राजकीय सल्ला दिला आहे.
यावेळी भाजपचा सुद्धा चांगलाच समाचार घेतला आहे. जितीन प्रसाद यांच्या येण्याचा उत्सव भाजपमध्ये साजरा केला जात आहे. यामागे उत्तर प्रदेश निवडणुकांचे जातीय गणित आहे. जितीन प्रसाद यांना भाजपमध्ये घेण्यामागे म्हणे उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांची बेरीज आहे. आता उत्तर प्रदेशातील ब्राह्मण मतांवर प्रसाद यांचा इतका प्रभाव असता तर ही मते ते काँग्रेसकडे का वळवू शकले नाहीत.
जितीन प्रसाद हे काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेसला फायदा नव्हता व भाजपमध्ये गेले म्हणून भाजपास उपयोग नाही. प्रश्न तो नसून काँग्रेस पक्षातील शेवटचे शिलेदारही आता नौकेवरून टणाटण उडय़ा मारू लागले आहेत हा आहे. असे शिवसेना म्हणाली आहे.
पुन्हा हे फक्त उत्तर प्रदेशातच घडतेय असे नाही. राजस्थानात सचिन पायलट यांनी आता पक्ष नेतृत्वास निर्वाणीचा इशारा दिला आहे. सचिन पायलट व त्यांचे समर्थक केव्हापासून अस्वस्थ आहेत व त्यांचा एक पाय बाहेर आहेच. सचिन पायलट यांनी वर्षभरापूर्वी बंडच केले होते. ते कसेबसे थंड केले तरी आजही खदखद सुरूच आहे. असे अनेक मुद्दे शिवसेनेने उपस्थित केले आहेत.
दरम्यान, शिवसेना कॉंग्रेसचे कौतुक करताना म्हणाली की, काँग्रेस हा आजही देशातील प्रमुख राष्ट्रीय तसेच विरोधी पक्ष आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्योत्तर काळातही उत्तम काम केले. आज देश जो उभा आहे तो घडविण्यात काँग्रेस राजवटीचे योगदान आहे. आजही जगाच्या पाठीवर ‘नेहरू-गांधी’ ही देशाची ओळख पुसता आलेली नाही. मनमोहन सिंग, नरसिंह राव, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा ‘ठसा’ कोणाला पुसता आलेला नाही. हेच काँग्रेसचे भांडवल आहे.