सोमवारपासून तळेगाव ढमढेरेतील बाजार सुरू होणार
शिरूर (प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील शिरूरचा शेळी-मेंढी बाजार शनिवार (दि. 29 ऑगस्ट) व तळेगाव ढमढेरे येथील बाजार सोमवार (दि. 31 ऑगस्ट) पासून सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती शंकरदादा जांभळकर यांनी दिली.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्ययार्ड शिरूर व उपबाजार तळेगाव ढमढेरे येथे येथील शेळी मेंढी बाजार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बंद होता. गेली अनेक दिवसापासून शेळी मेंढी पालक शेतकऱ्यांकडून शिरूरचा तसेच तळेगाव ढमढेरे येथील जनावरांचा बाजार लवकरात लवकर सुरू करावा अशी अनेक शेतकरी बांधवांनी सभापती उपसभापती व संचालक मंडळाकडे मागणी होत होती.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या-मेंढ्या विक्री विना पडून असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. दरवर्षी आषाढ महिन्यात मटणाचा मोठी मागणी असूनही कोरोनामुळे शेळ्या-मेंढ्या करडे बोकड विक्री करता आले नाहीत. अनेक शेतकरी कुटुंबे जोडधंदा म्हणून शेळ्या-मेंढ्या पालन करतात.
शेतकरी वर्गाच्या मागणीनुसार शिरूर तालुक्यातील शिरूरचा शेळी मेंढी बाजार शनिवार (दिनांक 29 ऑगस्ट) व तळेगाव ढमढेरे येथील बाजार सोमवार (दिनांक 31 ऑगस्ट) पासून सुरू होणार असल्याची बाजार समितीचे सभापती शंकरदादा जांभळकर यांनी सांगून शेळ्यामेंढ्या विक्रीसाठी घेऊन येताना सर्व शेतकरी, खरेदीदार यांनी तोंडाला मास्क किंवा रुमाल चा वापर करायचा आहे. तसेच बाजार मध्ये वावरताना सर्वांनी सोशल डिस्टन्स चा वापर करण्याचे आवाहन उपसभापती विकासआबा शिवले यांनी केले.