शिरूर -बोहल्यावर चढण्यापूर्वीच रामलिंग शिरूर येथील नवदाम्पत्य गणेश विष्णुपंत दसगुडे व प्रणिती यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शिरूर तहसीलदार कार्यालयामध्ये स्वत: येऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 21 हजार रुपयांची मदत केली आहे.
हा धनादेश शिरूरचे प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्याकडे देण्यात आला. यावेळी तहसीलदार लैला शेख, शिरूरचे मंडलाधिकारी निलेश घोडके, तलाठी विजय बेंडभर, सोन्या दसगुडे उपस्थित होते. शिरूर रामलिंग येथील गाडामालक विष्णुपंत धोंडीबा दसगुडे यांचा मुलगा गणेश व केंदूर येथील प्रसिद्ध गाडामालक शिवाजीराव डुकरे पाटील यांची कन्या प्रणिती यांचा विवाह करोना येण्याअगोदर ठरला होता.
लॉकडाऊनचे पालन करीत विवाह (दि. 8) गोरज मुहूर्तावर करण्याचे ठरले. विवाहापूर्वी प्रसिद्ध गाडामालक विष्णुपंत दसगुडे यांनी मुलाच्या विवाहामधील काही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे ठरवले. सायंकाळी साडेसहाच्यादरम्यान हे नववधू विवाह बंधनात बांधले गेले. सोशल डिस्टन्सच्या नियमांत व मोजक्याच नातेवाइकांच्या उपस्थितीत हा सोहळा समाजभान जपणारा ठरला आहे.