मुंबई : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात गौतमी पाटीलने केलेला डान्स सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तिने केलेला डान्सचा तो व्हिडीओ सोशल मोडियावर तुफान व्हायरल होत आहे. याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर ‘तुला काय वाईट वाटलं. ती बैलासमोर नाचेल नाहीतर आणखी कोणासमोर नाचेल. तुला का त्रास होतोय,’ अशी मिश्कील टिप्पणी अजित पवारांनी केली आहे.
“अनेक गावांत यात्रा, जत्रा सुरू आहेत. तेव्हा काही ठिकाणी करमणुकीसाठी तमाशे बोलवले जातात. त्यामुळे सध्या गौतमीचं नाव गाजत असून, पाटलीबाईंना आणा, याबद्दल मी सुचवलं होतं. जर त्यांना सुपारी परवडत, असेल तर नक्की बोलवावे,” असे म्हणत ‘यात्रेत पाटीलबाईला बोलवायचं का रात्री?’ या वक्तव्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
गौतमी पाटील विषयी बोलताना “बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो अधिकार आहे. हाच गौतमीचा व्यवसाय आणि उपजिविकेच साधन देखील आहे. कला आणि अभिनयाच्या माध्यमातून ती त्याच्याकडं पाहते. लहान मुलाचं बारसं आहे, त्याला अजून काहीच कळत नाही. तरी देखील बारशाच्या निमित्ताने बोलावलं, तर तिला नाचावच लागतं. बैलाचा वाढदिवस असो किंवा बैलपोळाच्या शर्यतीत बैलगाडा पहिला आला असेल, तिचे ते कामच आहे,” असेही अजित पवारांनी सांगितले.
धारशिव येथील अजित पवारांच्या सासुरवाडीत ‘भावी मुख्यमंत्री’ असे बॅनर्स लावण्यात आले होते. यावरूनही अजित पवारांनी फटकारले आहे. “असे बॅनर्स कोणी लावू नये. बॅनर्स लावून कोणीही मुख्यमंत्री बनत नसतं. त्यासाठी १४५ चे बहुमत लागते. एकनाथ शिंदेंनी वेगवेगळ्या कृल्प्त्या वापरून बहुमत मिळवलं. कोणालाच वाटलं नव्हतं ते मुख्यमंत्री बनतील. सासुरवाडीत माझ्यावर प्रेम उतू चाललंय. पण, सहकाऱ्यांना आवाहन करतो की, हा अतिशय चुकीचा आग्रह आहे. आपआपलं काम करा. आमदारांची संख्या वाढवा, तुमच्या विचारांचे आमदार निवडून आले, वरिष्ठांचे आशीर्वाद लाभले आणि आमदारांनी पाठिंबा दिला तर होऊ शकतं,” असेही अजित पवारांनी म्हटले.