‘ती’ अत्याचारानंतर राहिली गर्भवती; युट्युबवर पाहून गर्भपाताचा प्रयत्न केला अन्…

मुंबई : राज्यात  मागील काही दिवसापासून आपण विचारही करणार नाही अशा  बलात्काराच्या घटना समोर येत आहे. साकीनाका बलात्कार प्रकरण घडल्यानंतर काही दिवसांनीच एका अल्पवयीन मुलीवर तब्बल ३० जणांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली होती. अशीच एक घटना उपराजधानीतून समोर आली आहे.

नागपुरात एका २५ वर्षीय बलात्कार पीडितेने युट्यूब व्हिडिओ पाहून घरीच गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातच तिची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी शहरातील यशोधरा नगर परिसरात घडली. त्यानंतर पीडितेवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीवर बलात्कार आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

महिलेने पीटीआयला याविषयी जबाब दिला आहे.त्यानुसार, आरोपी शोएब खान (३०) लग्नाचे  अमिष दाखवून २०१६ पासून तिच्यावर बलात्कार करत होता. जेव्हा ती गर्भवती झाली, तेव्हा खानने तिला यूट्यूब व्हिडिओ पाहून तसेच इंटरनेटवर माहिती उपलब्ध असलेली औषधे घेऊन गर्भपात करण्यास सांगितले.

त्यानंतर पीडितेने युट्यूब व्हिडिओ पाहून घरातच गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान तिची प्रकृती खालावली आणि तिला तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल केले.या प्रकरणातील आरोपी शोएब खानला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.