“काँग्रेसचे लोकं, मेले होते मुख्यमंत्र्यांनी सरकारमध्ये घेतले म्हणून मेलेली लोकं जिवंत झाली”; शिवसेना समर्थक आमदाराचे धक्कादायक वक्तव्य

मुंबई : राज्यात  तीन पक्षांनी एकत्र येऊन आपली सत्ता स्थापन केली.  महाविकास आघडी सरकारमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सहभागी झाली आहे. दरम्यान, तिन्ही पक्षाची विचारधारा वेगळी आहे. त्याचाच फटका वेळोवेळी सगळ्यांना बसतो. याचेच आणखी एक उदाहरण समोर आले आहे.

उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये समावेश केल्याने मेलेले  काँग्रेसवाले जिवंत झाले असे  धक्कादायक वक्तव्य शिवसेनेचे समर्थक आमदार आशीष जयस्वाल यांनी केले आहे. आमदार आशीष जयस्वाल यांनी महाविकास आघाडीतील दोन्ही काँग्रेस पक्षांना चर्चेसाठी विषय दिला आहे.  त्यामुळे आशीष जयस्वाल यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आशीष जयस्वाल यांनी हे वक्तव्य केले  आहे.

“हे काँग्रेसचे लोकं. मेले होते तुम्ही, तुम्हाला कोणी विचारत नव्हतं. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला सरकारमध्ये घेतलं म्हणून हे मेलेले लोकं जिवंत झाले. नाहीतर यांच्या दोन्ही पक्षांमध्ये अशी गळती लागली होती की कुत्रं विचारायला तयार नव्हते. सर्व सुटकेस बांधून दुसऱ्या पक्षात जायला तयार होते. हे सर्व मेलेले लोकं जिवंत झालेले आहेत हे मी उघडपणे सांगतो,” असे आशीष जयस्वाल यांनी म्हटले आहे.

आशीष जयस्वाल हे रामटेक- नागपूर येथील शिवसेना समर्थक आमदार आहेत. २०१९ मध्ये रामटेक मतदारसंघात अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती. नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान आशीष जयस्वाल यांनी हे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.