मुंबई : छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री सायबर बुलिंगची शिकार झाली आहे. काही दिवसांपूर्वी तिचा फोन नंबर सोशल मीडियावर लीक झाला. यानंतर अनेक अनोळखी लोकांनी फोन आणि मेसेज करत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
‘तेरा यार हू मै’ या मालिकेतील अभिनेत्री विभूती ठाकूर ही सायबर बुलिंगची शिकार झाली आहे. नुकतंच एका मुलाखतीत विभूतीने या संपूर्ण प्रकरणावर खुलेपणाने भाष्य केले आहे. हे सर्व कसं घडलं? नेमकं काय झालं? याबाबत मला अजिबात माहिती नाही. तसेच हा नंबर कोणी लीक केला? याचीही मला कल्पना नाही. पण हे सर्व फार वाईट आहे, असे सांगताना विभूतीला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
विभूतीने एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीतया घडलेल्या प्रकरणावर भाष्य केले आहे. यावेळी विभूती म्हणाली, “कालपासून मला वेगवेगळ्या नंबरने फोन आणि मेसेज येत होते. आधी मला वाटलं की कोणीतरी माझ्यासोबत थट्टा मस्करी करत आहे. पण त्यानंतर त्यातील काही विकृत लोकांनी माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली, तेव्हा मात्र मला धक्का बसला. मी भावनिकरित्या खचले. मला मानसिक धक्का बसला. कारण आतापर्यंत मी माझ्या आयुष्यात अशा कोणत्याही स्थितीचा सामना कधीही केला नव्हता.”
“यानंतर मी एका कॉलरला फोन करुन या सर्व प्रकरणाची चौकशी केली. त्यावेळी मी त्याला नंबर कुठून मिळाला याबद्दल विचारले. तेव्हा त्याने मला एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तुमचा नंबर मिळाला, असे सांगितले. तसेच त्या संबंधित व्यक्तीनेच माझ्या नंबरवर अशाप्रकारे फोन आणि मेसेज करण्यासाठी सांगितल्याचेही तो म्हणाला. हा सायबर बुलिंगचा प्रकार आहे. यामुळे मी भावनिकरित्या अस्वस्थ झाली आहे”, असेही विभूतीने सांगितले.