मुंबई : सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या (का) विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार स्वत: रस्त्यावर उतरणार आहेत. मुंबईत 24 जानेवारीला होणाऱ्या निदर्शनाचे नेतृत्व पवार करणार आहेत, असे आयोजकांनी सांगितले.
महा विकास आघाडीच्या वतीने दादरमधील कामगार स्टेडियमवर होणाऱ्या निदर्शनात राज्यातील सत्ताधारी आघाडीचे सर्वोच्च नेते सहभागी होणार आहेत. याबाबतचा निदर्शने करण्याचा निर्णय मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत राष्ट्रवादी, भारतीय कम्यनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्ष, संयुक्त जनता दल, लोकभारती आदी पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती कपील पाटील आणि किरण पावस्कर यांनी दिली.
का, एनआरसी, एनपीआर यांचा जनतेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. धर्माशिवाय याचा फटका आदिवासी, भटक्या विमुक्त जमाती, लिंगायत आदींना याचा फटका बसणार आहे. ही लोकसंख्या देशाच्या लोकसंख्येच्या एक तृतीयांश आहे, असे पाटील म्हणाले. तर पावस्कर म्हणाले, या अत्याचारी कायद्याचा फटका नोटाबंदीपेक्षा भयानक असेल. कोणत्या एका धार्मालाच नव्हे तर संपूर्ण देशाला त्याचा परिणाम भोगायला लागू शकतो. घटनात्मक तत्वांचे रक्षण करण्यासाठी आणि देशाच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने केंद्राच्या या डावपेचांच्या विरोधात उभारले पाहिजे.
या आंदोलनासाठी आम्ही भारताचे लोक असा बॅनर असेल. तिरंगा घेऊन हे आंदोलन केले जाणार आहे. यात कोणत्याही पक्षाचा बॅनर नसावा अशी राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष गणेश देवी यांनी मांडलेली सुचना सर्वांनी मान्य केली. या बैठकीला पाटील, पावस्कर यांच्यासह कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, समाजवादी पक्षाचे मिराज सिद्दिकी, भाकपचे प्रकाश शेट्टी, अंजुमन इ इस्लामचे अध्यक्ष झहीर काझी, सुरेश माने, फारूक शेख, केलास गौड आणि सचिन बनसोड उपस्थित होते.
भाजपाचे माजी नेते आणि माजी केंद्रीय मंत्री 82 वर्षीय यशवंत सिन्हा यांनी काढलेल्या मुंबई ते दिल्ली गांधी शांती यात्रेला पवार, पृथ्वीराज चव्हाण, शत्रुघ्न सिन्हा यांनी झेंडा दाखवला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही बैठक झाली.