मुंबई – राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांकडून सध्या विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचा सूतोवाच होताना पाहायला मिळतोय. आमदार निलेश लंके यांनी पहिल्यांदा याबाबत भाष्य केले होते. त्यापाठोपाठ आमदार राजु नवघरे यांनी देखील अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत भाकीत व्यक्त केले. अशात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील याबाबत आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांनी वारंवार मुख्यमंत्री पदाबाबत इच्छा व्यक्त करून दाखवलेली असताना शरद पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पवार म्हणतात,”कोणाला काहीही आवडेल पण तुमची तेवढी संख्या पाहिजे ना? जर आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर आमच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. मात्र आज आमच्याकडे संख्या नाही त्यामुळे मला त्यावर भाष्य करणे योग्य वाटत नाही. ” नाशिकमध्ये पत्रकारांशी सवांद साधताना पवारांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केले.
राष्ट्रवादीमध्ये सध्या अनेक आमदार अनेक आमदार अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा बोलून दाखवताहेत. आमदार निलेश लंके यांनी देखील काही दिवसांपूर्वी ‘पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा असेल असं म्हणत आपल्या अजित दादांना मुख्यमंत्री करायचे आहे असं विधान केलं होते. विशेष म्हणजे यावेळी अजित पवार हे देखील उपस्थित होते.
आमदार राजु नवघरे यांनी व्यक्त केले भाकीत
नुकतच अजित पवार यांची हिंगोली येथे सभा पार पडली. त्यावेळी आमदार राजु नवघरे यांनी देखील अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचे भाकीत व्यक्त केले.हिंगोली जिल्ह्यातील शिरडशहापूर येथे जे आले ते मुख्यमंत्री झाले असे भाकीत आमदार राजु नवघरे यांनी शेतकरी मेळाव्यात बोलताना केले. सुधाकरराव नाईक शिरडशहापूरला आले अन् मुख्यमंत्री झाले. त्यानंतर काँग्रेस नेते विलासराव देशमुख आणि भाजप नेते देंवेंद्र फडणवीस शिरडशहापूरला आले अन् थेट मुख्यमंत्री झाले. त्यामुळे दादा, आज तुम्ही शिरडशहापूरला आला. २०२४ ला तुम्हीही मुख्यमंत्री होणार, असे भाकीत आमदार राजू पाटील नवघरे यांनी केले. शिरडशहापूरला नेत्यांची भेट आणि मुख्यमंत्री पदाचा योगायोग नवघरे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत उलगडला.